आ. जयंत पाटील यांची ग्वाही
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात खेळाची उंची आणि दर्जा सुधारत आहे.मधुकर ठाकूर चषक स्पर्धा ठाकूर कुटूंबियांनी अलिबागमध्ये भरविली आहे. मधुकर ठाकूर शुन्यातून विश्व निर्माण करणारी व्यक्ती होती. राजकारणासह समाजकारण व खेळामध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा होता. त्यामुळे त्यांची आठवण कायम स्मरणात राहवी यासाठी क्रीडाभवनच्या मैदानाला मधुकर ठाकूर यांचे नाव दिले जाणार आहे, अशी ग्वाही शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी (दि. 10) रोजी दिली. मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2024 स्पर्धेच्या वेळी आमदार जयंत पाटील बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रवीण ठाकूर, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, रवि ठाकूर, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनील थळे, अमिर उर्फ पिंट्या ठाकूर, काका ठाकूर, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अनिल चोपडा, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, कविता ठाकूर, ॲड. उमेश ठाकूर, पंकज पाटील आदी मान्यवरांसह खेळाडू, संघ मालक, प्रेक्षक व अलिबागकर आणि ठाकूर कुटुंबिय उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार जयंत पाटील म्हणाले,अलिबागमध्ये पहिल्यांदा आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेटचे सामने होणार आहेत. खेळातून अलिबागमध्ये अमूलाग्र बदल होत आहे.शहरामध्ये खेळासाठी पुरेशी जागा नाही. क्रीडाभवनजवळ जिल्हा सामान्य रुग्णालय असल्याने या ठिकाणी सामने भरविताना आणि इतर कार्यक्रम घेताना बंधने आहेत. त्या दृष्टीकोनातून विचार करून रुग्णालय आणि इतर कार्यालये गोंधळपाडा, वेश्वी परिसरात सरकारी जागेत असावे अशी मागणी विधीमंडळात केली आहे.
क्रीडाभवनचे मैदान नगरपालिकेने विशेष करून प्रशांत नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवंत ठेवले आहे. हे मैदान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताब्यात आहे, ते नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.मधुकर ठाकूर यांच्या नावाने होणाऱ्या या मैदानात प्रेक्षक गॅलरी, उद्यान व इतर सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. शहरातील समुद्रकिनारा सुधारण्याबरोबरच पर्यटक व स्थानिकांसाठी अधिक चांगल्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः खेळांमध्ये मोठा बदल करण्याचा मानस आहे. खेळाडूंची चांगली उन्नती होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ॲथलेटीक्स खेळासाठी वेगवेगळे स्पोर्ट्स क्लब जिल्ह्यात उभे करण्याचे काम सुरु आहे. असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
पुढे राजकारणाविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले, देशभर इंडिया आघाडीचे वातावरण आहे. मागील निवडणुकीत इंडिया आघाडीच्या वतीने निवडणुका लढविल्या आहेत. नाना कुंटे, दत्ता पाटील, खानविलकर हे नेते एक वेगळ्या वैचारिक बैठकीचे नेते होते. या पाच वर्षात वेगळे राजकारण झाले आहे. विधीमंडळातील पावित्र्य नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. आमदार म्हणून नारायण भगत यांनीदेखील चांगले काम केले आहे. मच्छीमारांच्या उन्नतीसाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. मच्छीमार सोसायट्यांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले. इंडिया आघाडीच्या माध्यमातून 28 पक्ष, संघटना एकत्र आल्या आहेत. त्यादृष्टीकोनातून रायगड जिल्ह्यात एक वेगळे परिवर्तन होणार असा विश्वास आहे. विकासाची गंगादेखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.