| पाली /गोमाशी | वार्ताहर |
नांदगाव विद्यालयातील 2003-04 मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथील नामदेव खैरे सभागृहात 10 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.
ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेसाठी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी देणे लागते या उदात्त भावनेने माजी विद्यार्थ्यांकडून दोन सिलिंग पंखे, 200 नग कलर पॅड, 150 नग पेन, 5 नग सोलर ब्लब तसेच नामदेव दळवी या विद्यार्थ्यांने वैयक्तिक माईक, माईक स्टॅण्ड, वायर सेट संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून गेली काही महिन्यापासून या विद्यार्थ्यांना एकत्र आणून आजचा योग घडवून आणला असे या कार्यक्रमाची प्रास्ताविक सादर करत असताना शेखर कदम यांनी सांगितले. माजी विद्यार्थीनी नीलिमा जंगम, नामदेव दळवी, संदीप शिंदे, रमण भिलारे, जयेंद्र उतेकर, मयूर पालांडे ,राकेश भगत या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेबद्दल शिक्षकांबद्दल असणारे प्रेम आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
सन 2004 मध्ये शाळेतील भौतिक सुविधा आणि आजची परिस्थिती ही खूप बदललेली आहे . त्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आज तुम्ही चांगल्या ठिकाणी नोकरी व्यवसायामध्ये स्थिरस्थावर आहात. तुम्हा विद्यार्थ्यांना त्यावेळी पाच सहा किलोमीटर अंतरावरून चालत यावे लागत होते मात्र आज या विद्यार्थ्यांना मानव विकास अंतर्गत शाळा ते घर अशी बस सेवा सुरू आहे. तुम्ही विद्यार्थी माझी शाळा तिची आठवण म्हणून येथे येऊन स्नेहमेळावा आयोजित केला त्याबद्दल संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. ही शाळा माजी विद्यार्थ्यांचे कायम स्वागत करेल असे संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे यांनी सांगितले.
या स्नेह मेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे, प्राचार्य संभाजी ढोपे, माजी प्राचार्य सदाशिव माने, निवृत्त शिक्षिका अर्चना निंबाळकर, कोडजाई हायस्कूल मुख्याध्यापक सुरेंद्र अहिरराव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, 2003-04 च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थीनी निता हुले यांनी मनोरंजक स्वरूपाचे करून वातावरण आनंदी ठेवले.