| मुरुड-जंजिरा | सुधीर नाझरे |
तीन महिन्यांच्या बंदीनंतर ‘समिंद्र आपलो, मासोळी आपली अन् दर्याच आपलो संसार!’ म्हणत मुरुडचा कोळी बांधव समुद्रवारीच्या तयारीला लागला आहे. 1 ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू होत आहे; पण सुरुवातीलाच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वारा-पावसानं दर्या खवळला. त्यामुळे बोटी किनाऱ्यावर, जाळी बोटीत आणि कोळ्याची नजर मात्र दर्याकडे आहे. हवामान निवळलं की, 5 ऑगस्टपासून खोल समुद्रात जाण्याची तयारी सुरू असून, यंदा सुरमई, पापलेट, बोंबील, कोलंबी, मुशीच्या भरघोस शिकारीवर कोळी बांधवांची सारी भिस्त आहे.
खोल समुद्रात जाण्यासाठी बोटींवर मासेमारीची जाळी चढविण्याचे काम सुरू आहे. डिझेल, पिण्याचे पाणी, अन्नधान्य, तेल तसेच आवश्यक साहित्याची जमवाजमव केली जात आहे. हवामान सुधारताच बोटी समुद्रात सोडण्याची तयारी मच्छिमारांनी केली आहे. दरम्यान, प्रलंबित डिझेल परतावा, कर्जाचा वाढता बोजा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छिमार आर्थिक अडचणीत आहेत. कोरोना काळातील कर्जाची परतफेड अद्याप पूर्ण झालेली नसल्याने प्रत्येक नव्या हंगामासाठी कर्ज काढावे लागत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. मच्छिमारांसाठी अत्याधुनिक मत्स्यपिंजरा किनारपट्टीवर भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून द्यावी, मासळी सुकविण्यासाठी प्रत्येक गावात ओटे उभारावे. प्रलंबित डिझेल परतावा तातडीने द्यावा, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईसाठी आपत्ती मदतीचे निकष बदलावे, अशी मागणी कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे.
समुद्र शांत होण्याची प्रतीक्षा
तीन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारीचा हंगाम सुरू झाला असला तरी खराब हवामानामुळे पहिली समुद्रवारी रखडली आहे. समुद्र शांत झाला की 5 ऑगस्टपासून बोटी खोल समुद्रात उतरविण्याची तयारी मच्छिमारांनी केली आहे.
मासेमारी बंदीनंतरचा पहिला हंगाम आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. सुरुवातीलाच वादळामुळे समुद्रात जाता आले नाही तर मोठे आर्थिक नुकसान होते. शासनाने प्रलंबित डिझेल परतावा आणि नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई तातडीने द्यावी.
कोळी बांधव





