रामेश्वर मुंडे यांचा यशस्वी प्रयोग
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
प्रख्यात पक्षी अभ्यासक रामेश्वर मुंडे यांनी आपल्या घराच्या गॅलरीत पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनवली होती. नष्ट होत चाललेला अधिवास व बदलत्या वातावरणाचा फटका पक्ष्यांना बसत आहे. त्यामुळे या कृत्रिम घरांचा प्रयोग मुंडे यांनी केला होता. याचा पक्ष्यांना नक्की फायदा होईल, असा विश्वास त्यांना होता. विशेष म्हणजे यातील एका घरात ठिपकेवाली मुनियाची जोडी रहायला आली असून त्यांनी येथे अंडीदेखील घातली आहेत.
रामेश्वर मुंडे यांनी सांगितले की, मार्च-एप्रिल महिन्यात एका दयाळ पक्ष्याची जोडी त्यांच्या घराच्या गॅलरीसमोर आवाज करत दीड ते दोन तास इकडून-तिकडे फेर्या मारत होती. मुंडे यांच्या लक्षात आले की, दयाळ पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरु झाला आहे आणि ही जोडी आपला संसार उभा करण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन मुंडे यांनी कृत्रिम घरटी बनवण्याचा निर्णय घेतला. आणि टाकाऊ प्लास्टिक बॉटलपासून त्याला गवत, नारळाचे साल, पुट्ठे आणि शाळेत प्रश्न-पत्रिका येतात त्या मोठ्या खाकी लिफाफ्याचे जाड कागद असे टाकाऊ साहित्य वापरून पाच ते सहा कृत्रिम घरटी तयार करून गॅलरी आणि खिडकीच्या बाहेर अडकवली. त्यादरम्यान ठिपकेवाली मुनिया नावाच्या पाहुण्याने खिडकीतील या घरट्याचा ताबा घेतला आणि थेट संसार मांडून त्यात मादीने अंडीही दिली.
त्यांनी घरात सर्वांना सांगितले की, आपल्या घरात काही दिवसांकरिता पाहुणे आलेले आहेत त्यांना अजिबात त्रास देऊ नका आणि ती खिडकी व पडदे सारखे उघडू नका फक्त लांबूनच निरीक्षण करा. शिवाय मुंडे यांची पत्नी व लहानग्या मुलींनी या घरट्याच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा स्वीकारली आहे. कावळा व इतर शिकारी पक्ष्यांना त्या घरट्याकडे फिरकू देत नाहीत.