खराब रस्त्यांमुळे लालपरी खिळखिळी, ‘या’ मार्गावरील गाड्या बंद

। पेण । प्रतिनिधी ।
एसटी महामंडळाच्या संपाने सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत होऊन आर्थिक नियोजनदेखील कोलमडले होते. आता कुठे संपातून बाहेर पडून लालपरीने रस्त्यावर धावायला सुरूवात केली होती. मात्र, पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे लालपरीचे विविध पार्ट निकामी होत असून, ती खिळखिळी होत आहेत. दरम्यान, एसटी महामंडळाने ज्या भागात खराब रस्ते, त्या भागातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांना प्रवास करण्यात अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. परिणामी, लालपरी बंद झाल्यास सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

राज्य एसटी महामंडळ आपल्या प्रवाशांना जास्तीत जास्त सुखकर प्रवास देत असतानाच आपला कमीत कमी तोटा कसा होईल आणि एसटी महामंडळाचा आर्थिक कणा मजबूत होण्यास मदत कशी होईल, याचा विचार करून अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असते. त्यातीलच एक निर्णय म्हणजे, रायगड जिल्हा एसटी महामंडळाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील झालेली रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन एसटी बसेसची सेवा केवळ रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एसटी बसेसची नादुरुस्ती होऊ नये, याची खबरदारी घेउन तात्पुरत्या स्वरूपात बंद केली. ही सेवा बंद करण्यात आल्याने ग्रामीण भागातील अनेक सवलतधारक ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी वर्ग, नोकरवर्ग यांना फटका बसला आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे लवकरात लवकर भरून वाहतुकीसाठी पूर्ववत करावे, जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेचा प्रवास सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या मार्गावरील गाड्या बंद
आजच्या घडीला पेण आगरामधून पेण-खरोशी, पेण-घोटे, पेण-जावळी, पेण-महागाव पाली, पाली- फणसवाडी, महाड आगारातून महाड-गोठवली, पोलादपूर किरणेश्‍वर, पोलादपूर ढवला या गाड्या बंद अवस्थेत आहेत. लवकरात लवकर रस्त्यांची गैरसोय दूर केली नाही, तर ग्रामीण भागातील प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागेल.

जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गासह ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते हे खेड्डेमय झाले आहेत, तरीदेखील आमच्या सर्व आगारांच्या गाड्या वेळोवेळी प्रवाशांच्या सोयीसाठी धावत होत्या. मात्र, मागील काही दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे याच रस्त्यांची अगदी विकट अवस्था झाली होती, त्याच्या फाटका मंडळाच्या गाड्यांना बसत होता. त्यामुळे आम्ही काही दिवस या गाड्या बंद केल्या होत्या. मात्र, प्रवाशांची गैरसेाय लक्षात घेता आम्ही या गाड्या पुन्हा सुरू केल्या आहेत. माझी प्रशासनाला विनंती राहील की प्रवासांचा प्रवास सुखकर व्हावा आणि आमच्या गाड्यादेखील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी तत्पर राहावी यासाठी हे रस्त्यांवर पडलेले खड्डे लवकरात लवकर भरण्यात व्हावेत.

अनधा बारटक्के, विभागीय नियंत्रक, रायगड

Exit mobile version