852 फेऱ्या रद्द; एका दिवसात 27.71 लाखांच्या उत्पन्नावर पाणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनासह एसटी वाहतूकही विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन रस्ते पाण्याखाली गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सोमवारी (दि. 6) सायंकाळपर्यंत एसटी महामंडळाला अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी, एका दिवसात तब्बल 27 लाख 71 हजार 280 रुपयांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, पावसाचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे.
रायगड विभागाच्या अखत्यारीत अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, महाड, माणगाव, श्रीवर्धन आणि मुरूड अशी आठ आगारे तसेच 19 हून अधिक बसस्थानके आहेत. जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कर्मचारी कार्यरत असून, त्यामध्ये दीड हजार चालक आणि वाहकांचा समावेश आहे. विभागाकडे 410 हून अधिक एसटी बसेस असून, त्यापैकी 200 हून अधिक बसेस सीएनजीवर, तर उर्वरित बसेस डिझेलवर धावतात. जिल्ह्यातून मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, शिर्डी, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी या लांब पल्ल्याच्या मार्गांसह गाव-वाड्यांपर्यंत एसटी सेवा पोहोचते. लाखो प्रवासी या सेवेचा लाभ घेत असून, एसटीला दरवर्षी सुमारे 35 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळते. विविध योजनांमधून विद्यार्थी आणि नियमित प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात.
महिला सन्मान योजनेंतर्गत जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील 2 कोटी 2 लाख 20 हजार 694 महिलांनी एसटीने प्रवास केला होता. त्यातून महामंडळाला 45 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवार आणि सोमवारी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भाग जलमय झाले. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. दरडी कोसळणे, पूरस्थिती आणि अनेक गावांचा संपर्क तुटल्याने एसटी वाहतुकीलाही मोठा फटका बसला.
अनेक सखल भागात पाणी साचल्याने एसटी बसेस त्या भागात पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे रायगड विभागाला शाळा फेऱ्यांसह गावपातळीवरील आणि लांब पल्ल्याच्या मिळून 852 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे 61 हजार 552 किलोमीटरचा प्रवास रद्द झाला आणि महामंडळाचे 27 लाख 71 हजार 280 रुपयांचे उत्पन्न बुडाले. सहा जुलै रोजी सकाळपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमुळे एसटीला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.
रद्द झालेल्या फेऱ्या : 852 रद्द झालेला प्रवास : 61,552 किलोमीटर बुडालेले उत्पन्न : 27 लाख 71 हजार 280 रुपये
