दोन दिवसांत 640 फेर्या रद्द उत्पन्न बुडाले; रत्नागिरीत शासकीय कार्यक्रमासाठी पाठवल्या बस
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
शासकीय कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातून दोन दिवस दीडशे बसेस रत्नागिरीमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन दिवसांमध्ये 640 एसटीच्या फेर्या रद्द करण्याची वेळ एसटी महामंडळ रायगड विभागावर आली. त्याचा फटका एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. आधीच तोट्यात असलेल्या एसटीचे मंगळवार व बुधवारी असे दोन दिवस 23 लाख 36 हजार रुपयांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती मिळाली आहे.
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित, अलिबाग, पेण, रोहा, मुरूड, कर्जत, माणगाव, महाड, श्रीवर्धन असे आठ एसटी बस आगार असून 19 बस स्थानके आहेत. जिल्ह्यात 420 बसेस असून त्यात दीडशे बसेस सीएनजीवर चालणार्या काही बसेस डिझेलवर चालणार्या आहे. त्यामध्ये शिवशाही बसेसचाही समावेश आहे. जिल्ह्यातून गाव पातळीसह मुंबई, पुणे, ठाणे, बोरीवली, कल्याण, शिर्डी, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट या लांब पल्ल्याच्या ठिकाणी एसटी बस धावतात. रायगडमधून दिवसाला एक लाख 25 हजार प्रवासी प्रवास करतात. यातून 45 लाख रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळते.
रत्नागिरी येथे एका कार्यक्रमासाठी रायगडमधून डिझेलवर चालणार्या 150 एसटी बसेस पाठविण्यात आल्या. दोन दिवस या बसेस रत्नागिरीला गेल्याने एसटी महामंडळाला जिल्ह्यातील अनेक फेर्या रद्द कराव्या लागल्या. मंगळवारी एका दिवसात 320 फेर्या रद्द झाल्या असून, 27 हजार किलोमीटरचा प्रवास रद्द झाला आहे. त्यामुळे 11 लाख 68 हजार रुपयांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून देण्यात आली. बुधवारीदेखील तीच अवस्था निर्माण झाली. त्यामुळे दोन दिवसांत 23 लाख रुपयांचे उत्पन्न कमी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गोविंदा, गणपती सणानिमित्त चाकरमान्यांची गावी जाण्याची तयारी सुरु झाली आहे. अनेक मंडळी त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी तयारी करू लागले आहेत. काही जण आतापासून गेले आहेत. मात्र, ऐन प्रवासी हंगामात बसेस रद्द होत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील सुरु झाल्या आहेत. शाळा फेरीच्या बसेस बंद झाल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. काही विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेत पोहोचता आले नाही, तर काहींना शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागली. सरकारने चांगल्या उपक्रमासाठी एसटी बसेस रत्नागिरीमध्ये मागविल्या असल्या तरीदेखील सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी, महिला वर्गाचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.