पीडितेला योग्य न्याय न दिल्यास शेकाप रस्त्यावर उतरणार
| रायगड | खास प्रतिनिधी |
आधुनिक जगात नकारात्मक सत्तेबरोबरच पुरुषत्वाचे पोकळ अवडंबर माजवणार्या विचारांना तिलांजली दिली पाहिजे. त्यानंतरच खर्या अर्थाने माणवतेकडे नेणार्या सुदृढ समाजाची निर्मिती होईल. परंतु, संबंधित सरकार हे अशा प्रवृत्तींना खतपाणी घालत असल्याचे कोलकाता, उरण, बदलापूर येथील घडलेल्या घटनेवरुन दिसून येते. यासाठी अशा प्रवृत्तींना वेळीच टाचेखाली चिरडून टाकण्याची आज वेळ आली आहे, असा संताप शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला. पीडितांना योग्य न्याय न दिल्यास शेकाप रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, तर बदलापूर येथील एका आदर्श शाळेतील दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याआधी उरण येथील यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्यावरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या होत्या. राज्यात अशा घटना कोठेना कोठे घडत आहेत. महिला, मुली आणि बालकांना संरक्षण देणे ही सरकाराची जबाबदारी आहे. परंतु, आताचे सरकार हे माझी लाडकी बहीण योजनेत मशगुल झाले आहे. तर, दुसरीकडे महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. महिलांच्या बँक खात्यात तुम्ही पैसे भराल, पण त्यांचे संरक्षण कसे करणार, असा सवाल चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला आहे.
महिलांना मालकीची वस्तू आणि उपभोगाचे साधन म्हणून बघण्याची प्रवृत्ती समाजातून दिली जाते. पुरुषप्रधान कौटुंबीक व्यवस्थाही याला अपवाद नाही. आपल्याकडे असणार्या सत्तेच्या मनगटावर आपण काहीही करू शकतो. हा पुरुषी अंहकार महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक शोषणाला पोषक ठरत असून, लाडकी बहीण रडतेय, सरकार काय करतेय, अशी म्हणण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
रोज वर्तमानपत्रात किमान एक तरी विनयभंगाची आणि बलात्काराची बातमी असते. अशा घटनांमध्ये फक्त लैंगिक शोषणाबरोबरच क्रूर आणि हिंसक मानसिकता दिसून येते. या प्रवत्तींना नाते, वय, शिक्षण, जात, धर्म असा कोणताच मुखवटा नाही. कधीपर्यंत रडत बसायचे, किती मेणबत्त्या जाळायच्या? आता विकृत मनोवृत्तीला जाळून टाकण्याची वेळ आली आहे, असा संताप चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
अत्याचाराला सामोरे जावे लागणार्या बालिका, मुली आणि महिलांचाही आता विशिष्ट वयोगट राहिलेला नाही. देशात आणि राज्यात महिला, मुली, लहान बालकं सुरक्षित ठेवायची असतील तर अशा नराधमांना सुळावर चढवले पाहिजे. यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करुन फाशीच्या शिक्षेची तरतूद केल्यास कोणताही पुरुष असे कृत्य करण्यास धजावणार नाही.