प्रशासन लवकरच करणार दुरुस्ती; दुरुस्तीसाठी पूल राहणार बंद
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
तळोजा औद्योगिक परिसरात प्रवेश करण्यासाठी नावडे रेल्वे फाटक येथे बांधण्यात आलेल्या पुलाला भले मोठे भगदाड पडले आहे. भगदाडामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून औद्योगिक वसाहतीकडून मुंब्रा-पनवेल महामार्गावर प्रवेश करण्यासाठी वापरात असलेल्या पुलाची एक मार्गिका वाहनांसाठी बंद ठेवण्यात आली असून, येत्या दोन दिवसात पुलाच्या दुरुस्तीचे काम एमआईडीसी प्रशासन हाती घेणार असल्याची माहिती एमआईडीसीच्या आधिकार्यांनी दिली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीत प्रवेश करताना नावडे फाटा येथील दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने एमआयडीसी प्रशासनातर्फे रेल्वे पूल उभारण्यात आला आहे. 2004 साली बांधण्यात आलेल्या या पुलाची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाची आहे. मात्र, एमआयडीसी प्रशासन पुलाच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे करत असलेल्या दुर्लक्षामुळे पुलाची दुरवस्था झाल्याचा आरोप शेकापचे विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष अजित अडसुळे यांनी केला आहे. दरम्यान, अडसुळे यांनी केलेल्या आरोपाबाबत एमआयडीसी अधिकार्यांकडे विचारणा केली असता पुलाच्या बेरिंगच्या दुरुस्तीचे काम एमआयडीसी प्रशासन करते. स्लॅबचे काम करणं शक्य नसल्याने येत्या दोन दिवसांत बेअरिंग बदलून स्लॅब टाकण्यात येणार असल्याची माहिती दिली. तळोजा वाहतूक विभागाला पत्र देऊन शुक्रवार (दि. 23) पासून पुढील तीन दिवस पुलावरील वाहतूक वळवण्याची मागणी वाहतूक विभागाकडे करण्यात आल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.