| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग एसटी बस स्थानकाच्या आवारात कचऱ्याचा ढिगारा साचला होता. प्रवासी वर्गाकडून या अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. कृषीवलने बातमीच्या रुपात याबाबत आवाज उठविल्यावर एसटी बस आगार प्रशासन तातडीने कामाला लागले. कृषीवलच्या दणक्याने साचलेला कचऱ्या ढीगारा काढून परिसर स्वच्छ केले.
अलिबाग एसटी बस आगारातून रोहा, पनवेल, मुरूड, कर्जत, खोपोली, पुणे, मुंबई, शिर्डी, नाशिक अशा अनेक ठिकाणी एसटी बसेस जातात. एसटीतून प्रवास करणाऱ्याची संख्या प्रचंड आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी प्रवासी एसटीतून नियमीत प्रवास करतात. अलिबाग स्थानकात प्रवाशांची कायमच वर्दळ राहिली आहे. अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने या ठिकाणी येणाऱ्यांची संख्यादेखील वाढू लागली आहे. मात्र अलिबाग एसटी बस स्थानकात कचऱ्याचा ढिगारा पाहून अनेकांनी अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. अलिबाग स्थानकात असलेल्या कचऱ्याबाबत नाकच मुरडले. स्थानकात गेल्या अनेक दिवसांपासून हा कचरा पडून होता. याबाबत दैनिक कृषीवलने आवाज उठवत अलिबाग आगार बनले कचरा डेपो या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली. कृषीवलच्या दणक्याने गुरुवारी प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचऱ्या ढीगारा काढून परिसर स्वच्छ केला.
अलिबाग स्थानकात असलेला कचरा काढण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार शुक्रवारी आवारात पडलेला कचरा काढण्याचे काम कर्मचाऱ्यांनी केले. आता हे परिसर स्वच्छ झाले असून त्याठिकाणी कचरा टाकू नये अशी सुचना संबंधितांना देण्यात आली आहे.
राकेश देवरे
व्यवस्थापक अलिबाग एसटी