महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हण बहरले

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

महाराष्ट्राचे राज्यपुष्प किंवा राज्यफुल म्हणजे ताम्हण किंवा तामण हे आहे. सध्या जिल्ह्यात जंगल, माळरानावर व रस्त्याच्या कडेला वाहत्या पाण्याशेजारी या जांभळ्या फुलांनी बहरलेली झाडे दिसत आहेत. हिरव्या गर्द रानात ही आकर्षक फुले पाहून प्रसन्न वाटते.

ताम्हण किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित आहे. कोकणात या वृक्षाला ममोठा बोंडाराफ असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव: Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae आहे. मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडातील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्‍चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. चांगली उंच वाढणारी ही झाडे रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसतात. या वनस्पतीला फुले एप्रिल ते मे च्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या काळात बहरत असल्याने याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे. मात्र पावसाळ्यात देखील या झाडाला बहर येतो. तामणाचे फूल लालसर-जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते. भरपूर पाणी मिळणार्‍या ठिकाणी तामणाचे वृक्ष वाढतात. तामण हा रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावण्यास उत्तम वृक्ष आहे.

फुलांचे वैशिष्ट्ये
हे फूल पूर्ण उमलल्यावर सहा-सात सेंटिमीटर व्यासाचे होते. झालरीसारखी दुमड असणार्‍या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या हे या फुलाचे वैशिष्ट्य. फुलातील रंगसंगती सुंदर असते. शांत, शीतल, प्रसन्न रंगाच्या पाकळ्या, त्यांच्या मध्यभागी विरुद्ध रंगाचे नाजूक पुंकेसर असतात. फुलांची रंगछटा जमीन, पाणी हवामान अशा घटकांनुसार बदलू शकते.

लाकूड उपयुक्त
या झाडाचे लाकूड उंच, मजबूत, टिकाऊ, चमकदार लाल रंगाचे असून सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. लाकडावर उत्तम प्रकारे कोरीव काम करता येते. समुद्राच्या खार्या पाण्याचा लाकडावर परिणाम होत नाही. ते लवकर कुजतदेखील नाही. त्यामुळे बंदरामध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी वापरतात. त्याचा वापर इमारती, पूल आणि विहिरीचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगन तसेच विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी होतो. झाडाचे साल औषधी असते. ताप आल्यास याच्या सालीचा काढा दिला जातो.

ताम्हण हे आपले राज्यफुल आहे या बद्दल अनेकांना माहीत नाही. त्यामुळे शाळांमधून या संदर्भात अधिक माहिती देणे व जागृती करणे आवश्यक आहे. झाडांची वाढ लवकर व जोमाने होते. बियांपासून सहज रोपे तयार करता येतात. यामध्ये जांभळा, पांढरा आणि गुलाबी फुले येणारे तीन प्रकारचे झाडे आहेत. तसेच खुरटे म्हणजे कमी उंचीचे व उंच व मोठे असे झाडांचे दोन प्रकार असतात. कमी उंचीचे झाड उद्यान व बागेत लावण्यासाठी अधिक वापरतात.

राम मुंडे, वनस्पती व वन्यजीव अभ्यासक शिक्षक, विळे

एक निसर्ग प्रेमी म्हणून तामन ह्या फुला विषयी सांगायचे झाल्यास निसर्गाचे एक वेगळे रूप पाहायला मिळते. आकर्षक आणि मनमोहक रंगाचा अप्रतिम नमुना म्हणजे ताम्हण आहे. दाट फुलांनी बहरलेली झाडे मनाला मोहून टाकतात. जिल्ह्यात फिरताना अनेक ठिकाणी फुले दिसतात.

अमित निंबाळकर, फुलझाड व उद्यान तज्ञ, ग्रीनटच नर्सरी, पाली
Exit mobile version