उघड्या नाल्यातून पसरतेय दुर्गंधी

नागरिकांचे आरोग्य धोक्यात, बंदोबस्त करण्याची मागणी

पाली/बेणसे । वार्ताहर ।

पाली बसस्थानकासमोरील दोन भल्या मोठ्या व उघड्या नाल्यातून मोठ्याप्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. येथील अक्षम्य अस्वछता व असह्य दुर्गंधी यामुळे बसस्थानक व आजूबाजूच्या बाजारपेठेत येणार्‍या जाणार्‍या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना सारख्या जागतिक आजाराने राज्य व देशातील जनतेला बेजार केले होते, आता पुन्हा कोरोना दरवाजा ठोठावत आहे. सर्वत्र स्वच्छता व जनजागृतीवर भर दिला जातोय, अशातच पाली बसस्थानकाचे प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर मागील अनेक वर्षांपासून दोन मोठे नाले आहेत. या नाल्यात प्लास्टिक बाटल्या, कुजलेले अन्न, गटाराचे घाणीचे पाणी तुंबत असून अनेक कीटक जीवजंतूची पैदास होत आहे. शिवाय हे नाले उघडे असल्याने यातून सतत दुर्गंधी येत असते.

या नाल्यात अनेकदा वाहने फसून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या नाल्याच्या बाजूने बसस्थानकात एसटी बस शिरतात व येथूनच बाहेर देखील येतात, त्यामुळे मोठ्या अपघाताची देखील शक्यता आहे. नागरिकांची सातत्याने मागणी होऊन देखील अद्यापपर्यंत या नाल्यांच्या बाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली दिसत नाही. पाली बसस्थानक असल्याने या ठिकाणी सतत नागरिकांची वर्दळ व रहदारी सुरू असते, शिवाय सभोवताली दुकाने, हॉटेल, रसवंती गृह तसेच मच्छी व मटण मार्केट असल्याने नागरिकांची रेलचेल असते. त्यामुळे या नाल्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ या नाल्याचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी जन माणसातून जोर धरत आहे.

पाली बसस्थानक हे अत्यंत मोक्याचे व वर्दळीचे ठिकाण आहे. मात्र या परिसरात प्रचंड घाण व दुर्गंधी असते. प्रवाशी, नागरिक विद्यार्थी नाक धरून उभे असतात. मिनडोअर रिक्षा स्थानक देखील इथेच आहे, मात्र बसस्थानकासमोर असलेले नाले प्रशासनाला दिसत नाहीत. मोठा अपघात झाल्याशिवाय कुणाचे डोळे उघडतील अस वाटत नाही.

महेश पोंगडे,
जागरूक नागरिक
Exit mobile version