आराठी गावात मृत श्वानांची दुर्गंधी

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील आराठी गाव हद्दीतील शाळेसमोरील कचरा समस्येकडे अद्याप कोणी पहात नाही. परिणामी येथे कचरा, सांडपाणी या अस्वच्छतेत आणखी मृत श्वानांच्या दुर्गंधीची भर पडली आहे. शाळा सुरू झाल्याने या दुर्गंधीचा त्रास विद्यार्थ्यांना होत असून, आरोग्य धोक्यात आले आहे.

राज्यभर शाळा सुरू होण्याचा आनंद म्हणून सर्वत्र प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, आराठी गाव हद्दित असणाऱ्या गोखले महाविद्यालयाच्या गेटसमोर पहिल्यापासून कचऱ्याचा राडारोडा वाढत असताना, त्यात पाच मृत कुत्र्यांना फेकून दिल्याने दुर्गंधीने कळस गाठला आहे. श्रीवर्धन, बोर्लीपंचतन, हरिहरेश्वरकडे ये-जा करणारा पर्यटक, स्थानिक नागरिकांचा मुख्य मार्ग आहे. याच मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे सतत तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. सोमवारी तालुक्यातील सर्व शाळेकडून प्रवेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. मात्र, या दुर्गंधीमुळे शाळेमध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमधून नाराजी दिसून आली. या दुर्गंधीचा त्रास वाढल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

लवकरच कचरा हटवण्यात येईल. या समस्येसाठी उपाययोजना म्हणून यापुढे कचरा करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

प्रविण राऊत,
ग्रामसेवक.

Exit mobile version