शुक्लतीर्थाकडे जाणार्‍या पायर्‍यांची दुरवस्था

ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्टचे अक्षम्य दुर्लक्ष

। हरिहरेश्‍वर । वार्ताहर ।

दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्‍वर परिसरातील शुक्लतीर्थाकडे जाणार्‍या पायर्‍यांची अंत्यत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या पायर्‍यांच्या दुरुस्तीच्या कामांकडे ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्ट यांनी पुर्णपणे दुर्लक्ष केले असल्याने स्थानिक नागरिक, भाविक आणि पर्यटकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भारतातील दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र म्हणून हरिहरेश्‍वर प्रसिद्ध असून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे पर्यटन केंद्र असल्याने हजारो भाविक आणि पर्यटक या परिसराला भेट देत असतात. सावित्री, गायत्री, कृष्णा, कोयना आणि वेण्णा या पंच नद्यांचे पवित्र जल हरिहरेश्‍वर येथील समुद्राला एकत्र मिळते ते ठिकाण शुक्लतीर्थ म्हणुन ओळखले जात असुन त्याची पौराणिक माहिती स्कंद पुराणात नमुद आहे. काशी क्षेत्राप्रमाणे हरिहराच्या डोंगराभोवती शुक्लतीर्थ धरुन प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. येथील अथांग पसरलेला समुद्र आणि फेसाळणार्‍या लाटा यांचे विलोभनिय दृश्य पहाण्याकरीता आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विष्णुपद, गायत्रीतीर्थ आणि शुक्लतीर्थाचे दर्शन घेण्याकरीता भाविक आणि पर्यटक या परिसराला आवर्जुन भेट देत असतात. शुक्लतीर्थाकडील पायर्‍यांच्या कामाचा विकासकामात समावेश असताना शासनाने याकामाकडे पाठ फिरवल्याने या पायर्‍यांची वाट अत्यंत बिकट झाली आहे. पायर्‍या जागोजागी तुटलेल्या अवस्थेत असुन मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांना पायर्‍या उतरताना व चढताना दमछाक करत अपघाताचा सामना करावा लागत आहे. पायर्‍यांवर पाय ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

यावेळी डोंबिवली येथील पर्यटक व कायद्याचे विदयार्थी प्रसाद पवार यांनी मंदिर परिसर, समुद्रकिनारी आणि ग्रामपंचायत परिसरातील अस्वच्छता व असुविधेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी येणार्‍या भाविक आणि पर्यटकांकडुन हरेश्‍वर ग्रामपंचायतीकडुन पर्यटक प्रवेश कर म्हणुन 5 रुपये वसुल करण्यात येत आहे. तसेच हरेश्‍वर देवस्थान ट्रस्टला ही भाविकांकडून मोठया रक्कमांच्या देणग्या मिळत असतात. मात्र, हरेश्‍वर ग्रामपंचायत व हरिहरेश्‍वर देवस्थान ट्रस्ट यांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गरजेच्या असणार्‍या सोईसुविधांकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक, भाविक आणि पर्यटक यांनी व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version