कुरवडे-मारळ पर्वतावरील बॉक्साईट मायनिंगला विरोध
। हरिहरेश्वर । वार्ताहर ।
दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर जवळील कुरवडे-मारळ या दोन गावांना जोडून असलेल्या मोरेश्वर पर्वतावर बॉक्साईट मालाच्या उत्खननामुळे येथील निसर्गरम्य पर्वत पूर्णपणे नष्ट होत असल्यामुळे येथील बॉक्साईट मायनिंग प्रकल्प तातडीने बंद करण्यात यावा या करीता येथील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेऊन शासनाकडे तक्रारी अर्ज दिला आहे. या दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने श्रीवर्धन तहसिल कार्यालयाकडून या बॉक्साईट मायनिंग प्रकल्पाची पहाणी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीवर्धन तालुक्यातील कुरवडे आणि मारळ या दोन गावांमध्ये असलेल्या मोरेश्वर पर्वतावर अलतगे स्टोन क्रशिंग इंडस्ट्रीज या कंपनीने मोठया प्रमाणात बॉक्साईट मालाचे उत्खनन करताना सुरुंग स्फोट घडवून तसेच पोकलन मशिन आणि जेसीबी मशिनद्वारे उत्खनन करुन येथील डोंगरपर्वत पूर्णपणे उध्वस्त केल्यामुळे या पर्वताला मोठमोठ्या भेगा पडून जमीन कमकुवत झाल्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झालेला आहे.
महाड येथील जुई, दासगांव आणि तळीये, खालापुर येथील ईर्शालवाडी, पुणे येथील माळीण आणि केरळ येथील वायनाड सारखी परिस्थिती भविष्यात उद्भवणार असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे बॉक्साईट उत्खनन करणार्या कंपनीवर आणि संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
श्रीवर्धनचे मंडळ अधिकारी कमलाकर गायकवाड आणि ग्राममहसुल अधिकारी बाळकृष्ण भामरे यांनी बॉक्साईट मायनिंग प्रकल्पाची पहाणी केली त्यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांचे लक्ष वेधुन हा बॉक्साईट मायनिंग प्रकल्प विनाशकारी असल्याबाबतची माहीती तसेच येणार्या समस्या व अडचणी सांगितल्या आहेत.
यावेळी कुरवडे गावचे अध्यक्ष योगेश पडयाळ, मारळ गावचे अध्यक्ष दिपक कवडे आणि बाणगंगा गावचे अध्यक्ष अशोक शिगवण, दिपक आरेकर, पत्रकार संदिप जाधव, पत्रकार संतोष जाधव, मारळ माजी सरपंच मंगेश चाचले, माजी सरपंच सागर चाचले, दिनेश भोजने, दिपक गोरिवले,रमाकांत पडयाळ मितेश लोहार, प्रथमेश पड्याळ, आतेश भुवड, पराग मयेकर, अमृत शिगवण, वैभव पड्याळ, संदेश शेडगे, वामन तटकरे, दयाराम खोपटकर, सिताराम खोपटकर, वैभव खोपटकर तसेच कुरवडे, मारळ, बाणगंगा (कोंडी) आणि हरिहरेश्वर परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या बॉक्साईट मायनिंग प्रकल्पामुळे पौराणिक आणि निसर्गरम्य पर्वत नामशेष होऊन या दोन गावांना धोका पोहचणार आहे. तसेच पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम होणार असल्यामुळे हा प्रकल्प कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.