| उरण | प्रतिनिधी |
वाढत्या प्रचंड उष्म्यामुळे द्रोणागिरी नोड आणि उरणला जोडणाऱ्या सिडकोच्या सागरी महामार्गावरील हजारो नारळी वृक्ष संकटात आले आहेत. यातील अनेक वृक्षांच्या फांद्या उन्हामुळे करपू लागल्या असून, अनेक वृक्ष संपूर्णपणे करपून गेले आहेत. सिडकोने जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा चार पदरी सागरी महामार्ग तयार केला आहे. समुद्र आणि खाडीलगत असलेल्या या परिसरात नारळाच्या वृक्षांची वाढ होण्यासारखे पोषक वातावरण आहे. नारळाच्या झाडांमुळे या परिसरातील सिडकोला उत्पन्न देणारा आणि त्याचबरोबर महामार्गाची वेगळी ओळख निर्माण करणारा ठरणार आहे.
द्रोणागिरी ते पागोटे या पाच किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गावर सिडकोने प्रचंड खर्च करून पहिल्यांदाच अडीच हजारांपेक्षा अधिक नारळाच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. मात्र, या वृक्षांची देखभाल होत नसल्याने हा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे या वृक्षांच्या देखभालीसाठी सिडकोच्या द्रोणागिरी नोड विभागाकडून खर्च केला जात आहे. मात्र, त्याचा फायदा होताना दिसत नाही. सिडकोच्या सागरी मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिक सकाळी व सायंकाळी चालण्यासाठी येतात.
या महामार्गाच्या दोन्ही मार्गिकांवर ही वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील नारळी वृक्षांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे विविध कारणांनी वृक्ष नष्ट होऊ लागले आहेत. गवताला लावण्यात येणाऱ्या आगीमुळे तसेच वेळेत पाणी न मिळाल्याने हे वृक्ष नष्ट होत आहेत. सागरी महामार्ग हा भविष्यात प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हे ओळखूनच सिडकोने लाखो रुपये खर्च करून नारळाच्या वृक्षांच्या लागवडीचा उपक्रम राबविला आहे. परंतु, आता याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. उरणमधील वाढते प्रदूषण आणि घटती जंगल संपदा यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात सिडकोने या मार्गाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नारळी वृक्षांची जपणूक करावी अशी मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ते निकेतन ठाकूर यांनी केली.
वृक्षांचे संरक्षण, संवर्धन करण्याची मागणी
वृक्षांना वेळेत पाणी न दिल्याने वृक्षांची पाने जळू लागली आहेत. त्यामुळे अनेक वृक्ष नष्ट होऊ लागली आहेत. त्याचप्रमाणे या परिसरात गवताला लावण्यात येणाऱ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. अनेकदा अशा प्रकारच्या आगी लागल्याने नारळी वृक्षांची संख्या कमी होत आहे. याकडे सिडकोने लक्ष देऊन नारळी वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. देखभालीअभावी सिडकोच्या सागरी महामार्गावर लावण्यात येत असलेल्या नारळाच्या हजारो वृक्षांचे असित्त्व धोक्यात आले आहे.







