। नेरळ । प्रतिनिधी ।
ममदापूर ग्रामपंचायतीमधील कॉलेज रस्ता ते कृष्णा व्हॅली या रस्त्याचे काँक्रिटीकरण रोशन शिंगे यांनी केले. 127 मीटर लांबीचा रस्ता दहा लाख रुपये खर्चून बनविल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी शिंगे यांचा सत्कार केला.
नेरळ विकास प्राधिकरणामध्ये असलेल्या ममदापूर ग्रामपंचायतीमधील बहुसंख्य रस्ते हे काँक्रिटीकरणापासून दूर आहेत. त्यातील नवीन वसाहत मधील कृष्णा व्हॅली ते कॉलेज रस्ता या रस्त्यावरून स्थानिक रहिवाशी यांना चालणे देखील कठीण होऊन बसले होते. त्याबद्दल स्थानिक रहिवाशी यांनी ममदापूर ग्रामपंचायतीमधील रोशन शिंगे यांची भेट घेवून सरकारी निधी उपलब्ध करून रस्ता बनविण्याची विनंती केली होती. मात्र शासन दरबारी प्रयत्न करून निवडणूक आचारसंहिता अडथळा येत असल्याने रोशन शिंगे यांनी शासनाचा निधी मिळाला नाही तर आपण स्वतः आर्थिक भार उचलून रस्त्याचे काँक्रिटीकरण करू असे आश्वासन दिले होते. रोशन शिंगे यांनी शासनाकडून रस्त्याचे काम मंजूर होईल किंवा नाही. याकडे लक्ष न देता आपल्या स्वतःकडून 10 लाख रुपये खर्चून कृष्णा व्हॅली ते कॉलेज रोड हा 127 मीटर लांबीचा रस्ता काँक्रिटीकरण करून घेतला. तब्बल सव्वा तीनशे फूट लांबीचा रस्ता रोशन शिंगे यांनी बनवून दिल्यामुळे स्थानिकांची गैरसोय दूर झाली आहे.