विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रयोगांनी वेधले मान्यवरांचे लक्ष
। माणगाव । वार्ताहर ।
शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान हे ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर ठेवून व भविष्यातील भारतासाठी शास्त्रज्ञ निर्माण करण्याहेतू माणगाव पंचायत समिती, अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव व गणित विज्ञान अध्यापक मंडळ ता. माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोकदादा साबळे विद्यालय, माणगाव येथे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात 49 तर माध्यमिक गटात 33 उपकरणांची मांडणी करण्यात आली असून नव साक्षरता अभियानासंदर्भात असलेला ‘उल्हास नवभारत’ साक्षरतेचा विभाग मुख्य आकर्षणाचा भाग ठरत आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांनी आपल्या प्रास्ताविकेतून विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू सर्वांसमोर मांडत शाश्वत कृषी पद्धत, स्वच्छता व आरोग्य संसाधन व्यवस्थापन याविषयीचे महत्त्व विशद केले. पहिल्याच दिवशी 700 ते 800 विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शन पाहण्यासाठी सहभाग नोंदविला. दरम्यान, सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेपासून लांब राहून विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले.
विज्ञान शिक्षकांनी विज्ञानाबाबत जनजागृती करुन अंधश्रद्धामुक्त भारत घडविण्याचे आव्हान केले. याप्रसंगी अशोकदादा साबळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाईंवर एकपात्री नाटिका व आपले मनोगत सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.