। रायगड । प्रतिनिधी ।
आधुनिक युगामध्ये सारेकाही बदलत चालले आहे. काळानुसार शाळेतील दगडी पाटी केव्हाच गायब झाली आहे. त्याची जागा आता वह्या-पुस्तकांनी, इलेक्ट्रॉनिक साधनांनी घेतली आहे. पूर्वी पहिली ते चौथीपर्यंत पाटीचाच वावर व्हायचा; परंतु आता पहिलीपासूनच मुलांना वही-पेन्सिल असल्याने पाटी नजरेआड झाली आहे.
प्राथमिक-माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. बाजारपेठेत आपल्या पाल्यासाठी दप्तर, वह्या, पुस्तके, गणवेश या वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालकांची गर्दी होत असली तरी यात दगडी पाटी कालबाह्य झालेली दिसते. बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात व त्यांच्या साहित्यामध्येही खूप बदल झाले आहेत. हल्ली मुलांच्या हाती पाटीऐवजी वह्या, मोबाईल टॅब, संगणक दिसतात; तर पेन्सिलऐवजी पेन. बालवाडीतील मुलांना पाटीचा आधार घेऊन रेषा, विविध आकार, चित्रे रंगवण्यासाठी दिली जाते. त्यानंतर पहिलीपासून ही पाटी अडगळीत पडून कायमचीच लुप्त होते. एरवी अगदी पाचवी- सहावीपर्यंत वापरली जाणारी पाटी आता पूर्णतः गायब झाली आहे.पूर्वी शिक्षणाचा श्रीगणेशा दगडी पाटीवरच व्हायचा. दसर्याला पाटीवर सरस्वतीचे चित्र काढून पूजा केली जायची. शाळा म्हणजे पाटी, आणि पाटीवर गिरवलेले अक्षर म्हणजे सुरेख लेखन, अशी शिक्षणाची पद्धत होती, मात्र आता शाळा म्हणजे नवा गणवेश, पाठीवर बॅगेऐवजी सॅक, दगडी पाटीऐवजी वही, पेन्सिल, टॅब आदी आधुनिक प्रणाली मुलांच्या अंगवळणी पडली आहे.







