सुधागडातील पथदिवे लवकरच उजळणार

मनसेचे प्रयत्न, प्रशासनासमवेत बैठक
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील विविध प्रश्‍न व समस्यांवर मनसे अविरतपणे काम करतेय. पथदिवे चालू करण्यासंदर्भात सुधागड मनसे, गटविकास अधिकारी व महावितरण उपकार्यकारी अभियंता यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी लवकरच पथदिवे चालू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.
तालुक्यातील पथदिवे सुरू करण्यात यावेत, अशी मागणी काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे सुधागड मनसेने पाली महावितरणकडे केली होती. अन्यथा आंदोलनाचा इशारादेखील दिला होता. या अनुषंगाने गटविकास अधिकारी गजानन लेंडी, पाली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जतीन पाटील, मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे व पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी जतीन पाटील म्हणाले, की वीज बिले एप्रिल ते ऑगस्टपर्यंत भरावी लागणार आहेत. यासंदर्भातील शासन आदेशदेखील त्यांनी सादर केला. त्यावर गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी सांगितले, की तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची बैठक घेऊन योग्य निर्णय घेतो. त्यामुळे लवकरच प्रश्‍न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. यावेळी मनसे विभाग अध्यक्ष केवल चव्हाण, पाली शहर अध्यक्ष अंकुश चोरघे, चंदरगाव शाखा अध्यक्ष परेश वनगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version