संपामुळे मुरूडची बँकिंग सेवा विस्कळीत

स्टेट बँक, सहकारी बँका मात्र सुरू
। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात बँक कर्मचारी देखील सामील झाले असले तरी मुरूड सारख्या अर्धशहरी भागात बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाखा बंद असून स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय मुरूड शाखा तसेच सर्व सहकारी बँकाचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे मंगळवारी दिसून आले.
बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र बँकांच्या शाखा बाजार पेठेत असल्याने हाजारो ठेवीदारांची खाती या दोन शाखेत अधिक प्रमाणात आहेत.त्यामुळे या शाखांमध्ये ग्राहकांची मोठी वर्दळ असते.नेफ्ट, आरटीजीएस, चेक क्लीअरिंग डिमांड, रोख रकमेची देवाणघेवाण सर्वाधिक वरील दोन बँकांतून होताना दिसते. स्टेट बँक, आयडीबीआय बँक शाखा 1 किमी वर असल्याने आवश्यकता अधिक वाटल्यास ग्राहकांची यांना पसंती दिसते. त्यामुळे वरील दोन बँका बंद असल्याने बँकिंग कामकाज विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. नागरी पतसंस्था, सहकारी बँका, पतपेढी आदी संस्था मधील व्यवहार मात्र सुरळीत सुरू आहेत. मात्र चेक क्लिअरिंग अडकले असून 50 टक्के व्यवहार थंडावल्याचे दिसून आले.

Exit mobile version