रिक्षा व टॅक्सीचे सरसकट ऑनलाईन परवाने वाटपाला स्थगिती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रिक्षा व टॅक्सीच्या सरसकट ऑनलाईन परवाना वाटपामुळे हा वाहतुकीचा व्यवसाय बुडीत जाण्याची भीती होती. प्रवासी संख्या कमी व वाहनांची संख्या जास्त होण्याचे संकट निर्माण झाले होते. या वाटपाच्या निर्णयाला रायगड जिल्हा मिनीडोअर चालक मालक संघटनेच्यावतीने विरोध केला होता. निवेदनही दिले होते. अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा व टॅक्सीचे सरसकट ऑनलाईन परवाने वाटपाला स्थगिती दिली. मिनीडोअर संघटनेच्या लढ्याला यश आल्याचे जिल्हा मिनीडोअर संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी सांगितले.
मागेल त्याला सरसकट रिक्षा, टॅक्सीचे ऑनलाईन परवाने अर्थात परमिट देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी पेण व पनवेल आरटीओ कार्यालयाने 2017 पासून सुरुवात केली. रायगड जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा व लोकसंख्येचा विचार न करता शासनाने सोडण्यात आलेल्या परवानांमुळे व्यवसायावर गदा येण्याचे संकट निर्माण झाले होते. प्रवासी वाहतुकीचा व्यवसायच बुडीत जाण्याची भीती व्यक्त करत 2017 मध्ये रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून शासनाच्या सरसकट मागेल त्याला परवाना वाटपाच्या निर्णयाला संघटनेच्या वतीने विरोध दर्शवला होता. रिक्षा व टॅक्सीचे परवाने बंद व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा संघटनेबरोबर सोमवारी (दि.9) मुंबई येथील विधान भवनात बैठक झाली. या बैठकीमध्ये सरसकट रिक्षा व टॅक्सीचे परवाने देण्यास तूर्तास स्थगित दिली असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे अनेक वर्षे सुरू असलेल्या संघटनेच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
2019 पासून रजिस्टर झालेल्या मीटर टॅक्सीना डिव्हाइस बसवण्याची सक्ती करण्यात आली होती. परंतु, 12 हजार रुपये खर्च करून ज्या टॅक्सीना डिव्हाइस बसवण्यात आले होते, त्या बऱ्याच कंपन्या बंद झाल्यामुळे चालकांना पुन्हा एकदा 12 ते 14 हजार रुपये भुर्दंड सोसावा लागणार होता. याविषयी सखोल चर्चा करून ही जबाबदारी परिवहन विभागाची आहे, असे परिवहन मंत्र्यांनी मान्य करून यासंदर्भात सखोल चौकशी करून जेणेकरून टॅक्सी चालकांना नव्याने डिव्हाइस बसवण्याची गरज लागू नये, डिव्हाईस पुन्हा ॲक्टिव्हेट करून त्यांची वाहने पासिंग करून देण्यात यावी, डिव्हाइस ॲॅक्टिव्हेट करण्यासाठी नऊ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते. त्यातही कमीत कमी शुल्क आकारून ते डिव्हाइस रिचार्ज कसे करता येईल, यासंदर्भात राज्य परिवहन विभागाला कडक निर्देश या बैठकीत देण्यात आले. माणगाव येथे नव्याने पासिंग टॅक उभारणीचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी ग्वाहीदेखील देण्यात आली. ज्या विक्रम मिनीडोर टॅक्सींची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशी वाहने स्क्रॅप केल्यानंतर बदली वाहन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या. या बैठकीमध्ये परिवहन आयुक्त, रायगडचे जिल्हाधिकारी, पनवेल व पेणमधील प्रादेशिक परिवहन अधिकारी, रायगड जिल्हा विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयभाऊ पाटील, कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष दीपक म्हात्रे, उपाध्यक्ष सुधाकर यादव, सचिव विकास पारंगे, सहसचिव राजू भंडारी, खजिनदार शशिकांत पाटील, महाड ता. अध्यक्ष शेखर राखाडे, महेंद्र मनवे व इतर जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.







