| कोलाड | वार्ताहर |
जोरदार पावसामुळे खाडीत शिरणारे भरतीचे पाणी आणि पावसाच्या पाण्याचा जोर यामुळे खाडीतील मासळी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ओढा, नाले आणि शेतात शिरू लागली आहे. समुद्रातील मासेमारीला बंदी असल्याने या वल्गनीच्या माशांवर खवय्यांच्या उड्या पडत आहेत. यामुळे नदी किनारी, कालव्यात, तर डोंगर भागातून वाहणारे ओढे, शेतात, वल्गनदार आपले पागीर, जाळी कांडळ हातात काठी घेऊन मासे पकडण्यात धावपळ करत असताना दिसतात, तर दुसरीकडे अडचणीत आलेल्या खाडीकिनाऱ्यावरील छोट्या मच्छिमारांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.
रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात तसेच विविध परिसरात मागील दोन तीन दिवसांपासून धुंवाधार सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वल्गनीत शिवडा, वाम, मळ्याचे मासे, कटला, खवला, असे मासे आढळून येतात तर त्यांची चवच लय न्यारी म्हणून सारे खवय्ये वल्गनीच्या माशाकडे टक लावून बघत असतात. या दिवसात मासळी अंडी सोडण्यासाठी तसेच चिंबोऱ्या पिल्ले सोडण्यासाठी ओढे, तलावांमध्ये तसेच शेतकऱ्यांच्या शेतातही सैरावैरा धावत असतात. नदीपात्राजवळच्या शेतात आलेले मासे आणि चिंबोऱ्या पकडण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केलेली आणि जागोजागी शेतातल्या पाण्यात पाग लावलेल पाहायला गुरुवारी दिवसभर मिळत होते.





