रातवडच्या विद्यार्थ्यांनी फुलविली बाग

| माणगाव । वार्ताहर ।

छत्रपती शिक्षण मंडळ संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयातील विध्यार्थ्यांनी शाळा उपक्रमांतर्गत भाजीपाला लागवड केली आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक व ज्ञानरचनावादी, शैक्षणिक उपक्रम राबविणार्‍या माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयातील विध्यार्थ्यांनी शालेय परिसरात भाजीपाला लागवड केली. सदर भाजीपाला उत्पादन सुरू झाल्याने विध्यार्थ्यांच्या मेहनतीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. विद्यालयाने शालेय परिसरात असलेल्या जागेचा उपयोग करून यापूर्वी भाजीपाला लागवडीचा प्रयोग प्रत्येक वर्षी यशस्वी केला आहे. यामध्ये वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, केळी इत्यादी फळभाज्यांचे उत्पादन घेतले आहे. शाळेत घेतलेल्या यशस्वी भाजी उत्पादनातून प्रेरणा घेऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक एम .एस.जाधव यांच्या मार्गदर्शनाने विद्यालय परिसरात विविध फळ भाजीची, रोपांची लागवड करण्यात आली आहे. सदर रोपांची योग्य ती निगा राखून वारंवार देखभाल करण्यात येते.

सदर भाजीपाला उत्पादनातून विध्यार्थ्यांच्या श्रमाला फळ आले असून बागेतून उत्पादन सुरू झाले आहे. एकावेळी दोन ते चार किलो भाजी उत्पादन होत आहे. हा भाजीपाला विध्यार्थ्यांना पूरक पोषण आहार म्हणून दिला जातो. तसेच जास्तीचा होणारा भाजीपाला विकला जात असून यातून विद्यार्थ्यांना विक्री कौशल्य आत्मसात होत आहेत.

भाजीपाला लावताना यातून विध्यार्थ्यांना शेतीचा अनुभव मिळावा हा हेतू होता. आता उत्पादन मिळाल्यानंतर विध्यार्थ्यांचा आनंद वाढला आहे.पूरक आहार म्हणून हा भाजीपाला आम्ही विध्यार्थ्यांना देतो.

बी.के.काळे, शिक्षक

भाजीपाला लावताना, निगा राखताना, काम करताना आम्हाला आनंद मिळतो. विविध रोप लागवड कशी करायची हे यातून आम्ही शिकलो.

शुभम उभारे, विध्यार्थी
Exit mobile version