अभ्यासू, तत्वनिष्ठ नेता हरपला – आ. जयंत पाटील

– आ. जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधीमंडळातील संयमी व आक्रमकपणे काम करणारे आमचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाले. गेले 15 दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. गेले तीन दिवस मी देखील त्या ठिकाणी होतो. त्यांच्यासाठी हजारो कार्यकर्ते त्यांचे आयुष्य वाढावे, यासाठी प्रार्थना करीत असल्याचे पाहून त्यांच्या कार्याचा अभिमान वाटला. गणपतराव देशमुख यांच्यासारखे एक अभ्यासू, तत्वनिष्ठ विशेषतः गरीबांशी बांधिलकी असलेला, आपल्या मतदारसंघात पणजोबांपासून नातवांपर्यंत मतं घेणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता आहे. सर्वाधिक म्हणजेच तब्बल 11 वेळा एकाच पक्षाकडून निवडणूक जिंकणारे विक्रमवीर आमदार अशी गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. सांगोला तालुक्यात त्यांनी शेती, सहकार, पाणी, स्त्री सक्षमता यांबद्दल भरीव कामगिरी केली. अखेरपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या वैचारिक बैठकीशी ते एकनिष्ठ राहिले.

आज जवळपास पाचव्या पिढीने त्यांना मतदान केले आहे. त्याचा सार्थ अभिमान शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना तसेच सांगोल्यातील मतदारालाही आहे. सांगोल्यातील नवी पिढी जेव्हा तयार होते, तेव्हा ते आबांसाहेबांना पहिलं मत देणार असल्याच सांगतात. कारण सांगोल्याचं नंदनवन करण्याचे काम आबासाहेबांनी विधीमंडंळातील आपल्या वक्तृत्वावर, कार्यपद्धतीवर, सरकारशी भांडून, त्यांच्यावर दबाव आणून केले आहे. त्याठिकाणी पाण्याची योजना राबविण्याची मोठी कामगिरी केली. त्यामुळे पंढरपूर ते सांगोल्यापर्यंत 40 किमीची पाईपलाईन गेली 40 वर्षे अहोरात्र सुरु आहे.

सांगोल्यात प्रामुख्याने 100 गावे आहेत. गणपतरावांनी राबविलेल्या योजनेमुळे आज सांगोल्यातील 95 टक्के गावे नळाचे पाणी पित आहेत. याचे सर्व श्रेय गणपतराव यांना आहे. सांगोल्यात 10 इंचापेक्षाही पाऊस पडतो. अशा परिस्थितीत त्याच सांगोल्यात रोजगार हमी व फलोद्यान विभागामार्फत त्यांनी ज्या योजना राबविल्या, विशेषतः कृष्णा नदीचे पाणी किंवा सांगोल्यात टेंबुचे पाणी आणल्याशिवाय मरणार नाही, अशी त्यांची इच्छा होती, ते त्यांनी खरे करुन दाखविले. आज सांगोल्यात पाणी पुरविण्याचे काम त्यांनी केले, हे काम सांगोलेकर व संपूर्ण महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. सत्ता नसताना सातत्याने दोनवेळा ते मंत्री झाले. विधीमंडळात एकनिष्ठेने काम केले तर काय होऊ शकतं हे गणपतरावांनी दाखविले आहे.

गणपतरावांच्या जाण्याने विधीमंडळाच्या कामकाजात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरुन निघणारी आहे. नवी तरुण आमदार तसेच आमच्या सारख्या आमदारांनी त्यांचा आदर्श ठेवला आहे. विधीमंडळात कधीही गदारोळ झाला आणि गणपतराव देशमुख उभे राहिले तर दोन्ही बाजुचे सदस्य खाली बसून आबा काय बोलतात, हे शांतपणे ऐकून त्यांचे धोरण काय आहे, हे समजून मगच आपले धोरण ठरवून काम करीत असल्याचे आम्ही अनेकदा पाहिले आहे.

गणपतरावांनी आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते घडविले. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात हजारो कार्यकर्ते आज एकनिष्ठेने काम करीत आहेत. आत राजकारण बदलले आहे, या बदललेल्या राजकारणात आज पाच पिढ्या त्यांना भरघोस मतांनी निवडून देत आहेत, ही गणपतरावांच्या कार्याची पोचपावती आहे, त्यांच्या निधनाने राज्यातील शेतकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.

Exit mobile version