पाकिस्तानला नौटंकी महागात पडणार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पाकिस्तान क्रिकेट बोर्डने क्रॉफ्ट यांच्या निलंबनाच्या मागणीवर जोर धरला होता. परंतु, आयसीसीने त्यांना दाद दिली नाही आणि वाघासारखी डरकाळी फोडणारे मांजरीसारखे नरमले. पाकिस्तानचा संघ यूएईविरुद्धचा सामना खेळून अंतिम 4 मध्ये पोहोचले. परंतु, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदॲक्शन मोडमध्ये आली आहे. पाकिस्तान बोर्डाच्या नाटकामुळे यूएईविरुद्धचा सामना तासभर उशीराने सुरू झाला होता आणि यादरम्यान त्यांच्याकडून अनेक नियमांचे उल्लंघनही झाले होते. आयसीसीनेला पाठवलेल्या ई-मेलमध्ये गैरवर्तन आणि अनेक नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. सामन्यापूर्वी खेळाडू आणि सामनाधिकारी क्षेत्राशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा पीसीबीवर आरोप आहे.

आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी पीसीबीला पाठवलेल्या ई-मेल मध्ये, पीएमओए नियमांचे वारंवार उल्लंघन झाल्याचा उल्लेख केला आहे. पीसीबीनेही हा मेल प्राप्त झाल्याचे म्हटले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, यूएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट, मुख्य प्रशिक्षक माईक हेसन आणि कर्णधार सलमान अली आगा यांच्यात बैठक झाली आणि त्या बैठकीचे चित्रीकरण करण्याची परवानगी त्यांचे मीडिया मॅनेजर नईम गिलानी यांना दिली. ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. या तिघांमधील झालेल्या बैठकीचा व्हिडीओ पाकिस्तानी पत्रकारांनी व्हायरल केला आणि त्यामुळे आयसीसीने कारवाई करण्याचे ठरवले. आयसीसीकडून आता पीसीबीवर शिस्तभंगात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. मीडिया मॅनेजर्सना अशा बैठकींमध्ये प्रवेशबंदी असल्याचे आयसीसीने आधीच स्पष्ट केले होते. या बैठकीत पीसीबीने मीडिया मॅनेजर सोबत आणण्याचा आग्रह धरला आणि प्रवेश नाकारल्यास सामना खेळणार नाही, अशी धमकी पीसीबीने दिली होती. अखेर त्यांना प्रवेश देण्यात आला आणि त्यांनी बैठकीचे ऑडिओशिवाय चित्रीकरण केले, जे पीएमओएच्या नियमांचे आणखी उल्लंघन ठरले. याशिवाय, पीसीबीने जाहीर केलेल्या निवेदनामध्ये पायकॉफ्ट यांनी माफी मागितली, असा दावा केला होता. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी फक्त गैरसमजाबद्दल खेद व्यक्त केला होता.

Exit mobile version