पाले बुद्रुकवासीयांच्या प्रयत्नांना यश ; ग्रामस्थांनी मानले कृषीवलचे आभार


 रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील पाले बुद्रुक येथील ग्रामस्थांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या पारंपरिक जागेत दीड दिवसांच्या गणेश बाप्पाचे विसर्जन करण्यास प्रशासनाने मनाई केली होती. याची दखल घेत कृषीवल मधून रविवारी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.
 पाले बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप पाटील यांनी तातडीने उच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान देणारी रिट याचिका सोमवारी दाखल केली होती.मंगळवार 14 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.या सुनावणीच्या वेळी कृषीवल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची प्रत उच्च न्यायालयात सादर करण्यात आली असल्याची माहिती तंटामुक्त अध्यक्ष शिवराम महाबळे यांनी दिली आहे. या सुनावणी नंतर पाच व दहा दिवसांच्या गणेश बाप्पांचे पाले बुद्रुक ग्रामस्थांच्या पारंपरिक जागेवर विसर्जन करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून ग्रामस्थांची व्यथा व त्यांच्या पारंपरिक हक्कांची दखल घेऊन वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांनी कृषीवल टीमचे देखील आभार व्यक्त केले आहेत.

Exit mobile version