रणरणत्या उन्हामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
दिवसेंदिवस आता उन्हाची तीव्रता खुपच जाणवू लागली असल्यामुळे वातावरणात गेल्या काही दिवसांपासून बदल होऊन अचानक तापमान वाढल्याने सूर्य आग ओकू लागला की काय? असा प्रश्न विद्यार्थी पालक वर्ग, कामगार, वयोवृद्ध यांना पडले आहे. यामुळे घराबाहेर पडताना छत्री, स्कार्फ, गॉगल, टोपी आदी साधनांचा वापर करावा लागत आहे. या उन्हामुळे प्रत्येक व्यक्तीची अंगाची लाही-लाही होत आहे. यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.
सकाळी दहा वाजल्या पासूनच उन्हाच्या तडाख्यामुळे शरिरातून घामाच्या धारा वाहू लागत आहे. यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डोकेदुखी, चिडचिडेपणा, थकवा असा त्रास जाणवू लागले आहे. उष्णतेशी संबंध आल्यास उष्माघात होतो. थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेनी व अस्वस्थता, बेशुध्दावस्था ह्या उन्हाममुळे निर्माण होत आहे.
तालुक्यात उन्हाचा पारा वाढलेला दिसत असून, या रखरखत्या उन्हाच्या कडाक्याने नागरिक कमालीचे हैराण झाले. उन्हापासून बचाव करण्याकरिता पांढरे शेले व शुभ्र खादीच्या कपड्यांमध्ये वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीच वातावरणात आणखी चढ-उतार होत आहे. वाढती उष्णतेमूळे उन्हाळ्याच्या झळा असह्य होत आहे.
रणरणत्या उन्हामुळे घराच्या बाहेर पडणे अशक्य होत असून, तरी काही महत्त्वाच्या कामासाठी जावे लागते. मात्र, या उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी स्कार्फ, गॉगलचा आधार घ्यावा लागतो.
अन्वी जाधव,
विद्यार्थी







