सुपेगांव रस्त्याला झाडाझुडपांचा विळखा

सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड-रोहा प्रवासात जवळचा मार्ग असलेल्या मुरुड तालुक्यातील सुपेगांव रस्त्यालगत अनेक ठिकाणी असलेला झाडाझुडपांचा विळखा यामुळे अपघाताला आमंत्रण ठरत असून याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पर्यटक, प्रवासी, वाहनचालक व नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून साईडपट्ट्या साफ करण्याची मागणी केली जात आहे. मुरुड-जंजिरा पर्यटनात रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर अन्य ठिकाणाहून काशिद-बिच, फणसाड अभयारण्य, मुरुड-जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रोहा-सुपेगांव मार्गे मुरुड रस्ता जवळ असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. मागील महिन्यापासून या रस्त्यालगत बर्‍याच ठिकाणी झाडाझुडपांचा विळखा असून काही ठिकाणी रस्त्यावर झाडे झुकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वळणात समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यात लक्ष पुरवून झाडाझुडपांचा विळखा हटविण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.

Exit mobile version