हंगामी भाज्यांची आवक वाढली

| पनवेल | प्रतिनिधी |

थंडीचे दिवस सुरू होताच पनवेल शहरातील भाजी मार्केटमध्ये हंगामी भाज्यांची चांगलीच आवक वाढली आहे. दरम्यान, गावठाण आणि ग्रामीण भागातून पोपटीसाठीच्या वालाच्या शेंगा मोठ्या प्रमाणात पनवेल बाजारात दाखल झाल्या आहेत. सकाळी लवकरच शेतकरी आपला ताजा भाजीपाला थेट बाजारात आणत असल्याने वालाच्या शेंगा ताज्या व दर्जेदार मिळत आहेत. थंड हवामान या शेंगांच्या पिकासाठी पोषक ठरत असून यंदा उत्पादनात वाढ झाली आहे.

पनवेल बाजारात वालाच्या शेंगांसोबतच घेवडा, गवार, चवळी अशा इतर हंगामी शेंगांचीही आवक वाढली आहे. बाजारात विविध प्रकारच्या शेंगा उपलब्ध झाल्याने गृहिणींमध्ये खरेदीची चांगलीच लगबग दिसून येत आहे. सध्या वालाच्या शेंगांना मागणी जास्त असून दरही स्थिर असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. स्थानिक उत्पादनाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गही समाधान व्यक्त करत आहे. हिवाळी भाज्यांमुळे पनवेलच्या भाजी बाजारात पुन्हा एकदा गजबजलेपणाचे चित्र पाहायला मिळत आहे.

Exit mobile version