100 रुपयांना आठ ताडगोळे
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली सुधागडसह जिल्ह्यात सध्या ताडगोळे काही प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागले आहेत. मात्र गेल्यावर्षी या 100 रुपयांना एक डझन मिळणारे ताडगोळे यंदा 100 रुपयांना अवघे 8 किंवा 9 मिळत आहेत. ताडगोळ्यांचा हंगाम सुरू होण्यास अजून अवकाश आहे. शिवाय वातावरणात देखील बदल झाला आहे. उत्पादन कमी आहे. त्यामुळे किंमती वाढल्या आहेत. तरीदेखील हंगामात पहिल्यांदा आलेले ताडगोळे खवय्ये आवर्जून खात आहेत.
जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड आदी तालुक्यात ताडगोळ्यांचे मुबलक उत्पादन होते. येथून काही महिला विक्रेत्या किंवा विक्रेते जिल्ह्यात इतरत्र ताडगोळे विक्रीसाठी जातात. तर काही जण छोट्या टेम्पोत ताडगोळे घेऊन विविध बाजारात जातात किंवा महामार्गाच्या कडेला विक्रीसाठी बसतात. ग्राहक आल्यावर त्यास आवरण काढून ताजे ताडगोळे काढून दिले जातात. यामुळे ग्राहक देखील खुश होतात. ताडगोळे हे हंगामी फळ आहे. उन्हाच्या काहिली पासून दूर राहण्यासाठी थंडगार व मधुर ताडगोळे खायला सर्वांना आवडतात. मात्र सध्या थंडी सुरू आहे. तरी दुपारी वातावरणात उष्मा वाढत आहे. तसेच ते आरोग्यदायी देखील आहेत. परिणामी शरीराला थंडावा देण्यासाठी बहुतांश लोक ताडगोळे खरेदी करत आहेत.
चविष्ट, गुणकारी व आरोग्यदायी ताडगोळे
ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह, झिंक, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम असे अनेक गुणधर्म असतात. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यापासून उपयुक्त. मधुमेही व ह्रदय विकार असलेली माणसे देखील ताडगोळे खाऊ शकतात. यामुळे पचनशक्ती सुधारते. पोटात गॅस होणे, अपचन, पोटदुखी, जळजळ, बद्धकोष्ठता, मुळव्याध असे त्रास यामुळे कमी होतात. ताडगोळे खाण्यामुळे त्वचेला पुरेसे पोषण मिळते. शारीरिक थकवा कमी होतो. शरीराला योग्य उर्जेचा पूरवठा होतो.
उत्पादन कमी तसेच हंगाम सुरू होण्यास अवधी असल्याने यावर्षी ताडगोळ्याची किंमत वाढली आहे. छोटा पिकअप टेम्पो घेऊन महामार्गाच्या कडेला ताडगोळ्यांचा विक्री करतो. लोक आवर्जून खरेदी करतात. – महेंद्र खारकर, ताटगोळे विक्रेता.