10 जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा
| रसायनी | प्रतिनिधी |
मोहोपाडा येथील महिला उद्योग मंडळ संचलित प्राथमिक शाळेविरोधातील तक्रारींवर शिक्षण विभागाकडून कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ अरुण शांताराम गायकवाड यांनी 10 जूनपासून रायगड प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मोहोपाडा आळी-आंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
गायकवाड यांनी शाळेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 60 टक्के शासन अनुदानित असतानाही विद्यार्थ्यांकडून मासिक फी व देणगीच्या स्वरूपात रक्कम वसूल केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच स्वतःची जागा नसताना शाळा एचओसी कंपनीच्या जागेत चालविली जात असून, वाढीव तुकड्याही विनापरवानगी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.
शाळेची इमारत धोकादायक असल्याचे बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालात नमूद असूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या चौकशीतही शाळा विनापरवानगी स्थलांतरित झाल्याचे आणि जीर्ण इमारतीत भरत असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा त्यांनी केला.
याप्रकरणी अरुण गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांनी धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी व इतर रक्कम व्याजासह पालकांना परत करावी, तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे संबंधित शाळेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे पालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
