बॅलेट व कंट्रोल युनिटचा पुरवठा उपलब्ध
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांमधील 217 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पाडण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणाचा पुरवठा करण्यात आला आहे. 8 हजारहून अधिक बॅलेट युनिट आणि 2 हजार 900 कंट्रोल युनिट उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, श्रीवर्धन, मुरूड- जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान या नगरपरिषदांमध्ये 107 प्रभाग आहेत. 127 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दोन डिसेंबरला मतदान 308 मतदान केंद्रामध्ये 2 लाख 37 हजार 503 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने सोमवार दि.10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. मात्र, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेमार्फत मतदान केंद्राची पाहणी करण्यापासून तेथील देखभाल दुरुस्ती करण्याची सूचना नगरपालिका बांधकाम प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 8 हजार 700 बॅलेट युनिट मशीन उपलब्ध आहेत. यातील 2 हजार 400 मशीन रत्नागिरीला पाठविण्यात आल्या आहेत. 2 हजार 900 कंट्रोल युनिट असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. दिर्घ कालावधीनंतर नगरपरिषदांच्या निवडणूका होत आहेत, ही प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणादेखील कामाला लागली आहे. वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आचारसंहितेचा भंग होऊ नये, म्हणून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. नगरपालिका स्तरावर स्ट्राँग रुम असणार आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण घेतले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देणयात आली आहे.
अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. ही प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. स्ट्राँग रुमसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले जाणार आहे.
सागर साळुंखे,
मुख्याधिकारी तथा प्रशासक







