| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुसळधार पावसामुळे संपूर्ण अलिबाग तालुक्यात पूरपरिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले. सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने तालुक्याची दैना उडवली. यापूर्वी तालुक्यात अनेकवेळा पाणी तुंबले मात्र त्याचा निचरा त्याच तत्परतेने व्हायचा, पण यावेळी धनदांडग्यांसोबत आर्थिक हित जोपासणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने आणि प्रशासनाच्या मदतीने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम, कांदळवनांची कत्तल, बेसूमार भराव आदी कारणांमुळे भयानक स्थितीला तोंड द्यावे लागल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी नाल्यावरील अतिक्रमण, नाल्याचा प्रवाह बदलणे, खाडी किनारी खारफुटीची कत्तल करून अनधिकृत बांधकाम, पाण्याचा निचरा करण्याच्या नियोजनाचा अभाव, रस्त्यावर टाकण्यात आलेल्या डेब्रिजचा भराव या सगळ्यावर प्रशासनाचा कानाडोळा आदी कारणं याला जबाबदार ठरत आहेत. त्यामुळे आता तरी सरकारने महागड्या स्वप्नांसाठी नागरिकांना वेठीस धरु नये, अशी आर्त हाक नुकसानग्रस्तांनी मारली आहे.
प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी याबाबत कोणतेही नियोजन न केल्याचा फटका आज नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरात अतिवृष्टीने लोकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले आहे. त्यांना पुन्हा संसार उभा करण्यासाठी आमदार साहेब आपण काय करणार? असा सवालही नुकसानग्रस्तांनी उपस्थित केला आहे. पावसाळा सुरू झाला असून पाणी समुद्राला मिळण्याचे नैसर्गिक स्त्रोत भराव करून बुजविले आहेत. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या जिविताला धोका असून त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
नेमका विकास कोणाचा?
स्थानिक आमदार साहेबांनी कोट्यवधी रुपयांची कामे केल्याची बॅनरबाजी अनेकदा केली. पण नेमकी कुठे केली, हे त्यांना आणि त्यांच्या बगलबच्चांनाच ठाऊक, अशी संतप्त टीका नागरिकांना केली आहे. आपत्कालिन काळात नेहमीच गायब असणारे, मात्र निवडणुकीपुर्वी दर्शन देणारे आमदार नुकसानग्रस्तांना काय आधार देणार, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी काम करणाऱ्या आमदारांनी नेमका कुणाचा विकास केला, असे अनेक प्रश्न नागरिकांनी संतापाच्याभरात उपस्थित केले आहेत.
जिल्हाधिकारी, तहसीलदारांचे दुर्लक्ष
समुद्र किनाऱ्यापर्यंत अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. सीआरझेड आणि पूरनियंत्रण रेषेच्या नियमांचे उल्लंघन करून ही बांधकामे उभी राहत आहेत. जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचेही याकडे लक्ष नाही. पूरनियंत्रण रेषेच्या आत भराव टाकल्याने नैसर्गिक नाले अरूंद झाले आहेत. याआधी कधीही पूर येत नव्हता. मात्र, परिसराला अनधिकृत बांधकामांचा वेढा पडल्याने पहिल्याच पावसात घरात पाणी शिरते. एका पावसाळ्यात चार ते पाच वेळा पूरस्थितीचा सामना करावा लागतो. पुराचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक आणि शेतीला बसत असल्याचे नुकसानग्रस्त नागरिकांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडला. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. पाणी जाण्याच्या मार्गाला भरावाचा अडथळा निर्माण होत असल्यास संबंधित विभागामार्फत कारवाई करण्याच्या सूचना केल्या जातील. या आठवड्यात अलिबाग, रेवदंडा, रोहा मार्गावरील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची प्रत्यक्षात पाहणी करुन योग्य ती कार्यवाही केली जाईल.
संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड