पनवेल बाजार समितीत आंध्र प्रदेश, सोलापूरहून आवक; फुलोरा जोरात, मात्र फळधारणा कमी
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
जेवणाची चव वाढविणाऱ्या लिंबावर महागाईची संक्रांत आली असून, कमी आवकेमुळे लिंबाचे दर चांगलेच कडाडले आहेत. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक आवक घटल्याने आंध्र प्रदेश आणि सोलापूरहून लिंबू मागवावा लागत आहे. त्यामुळे घाऊक बाजारातील दरवाढीचा थेट फटका किरकोळ बाजारातील ग्राहकांना बसत असून, चांगल्या प्रतीचे एक लिंबू तब्बल 12 ते 15 रुपयांना विकले जात आहे.
गेल्या दीड महिन्यात झालेल्या पावसाचा लिंबाच्या पिकावर परिणाम झाला आहे. लिंबाच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फुलोरा आला; मात्र अपेक्षित फळधारणा झाली नाही. त्यामुळे बाजारातील आवक कमी होऊन लिंबाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या आंध्र प्रदेश तसेच सोलापूर भागातून लिंबाची आवक होत आहे. स्थानिक भागातून आवक कमी असल्याने बाहेरील बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत आहे. आवक आणि मालाच्या गुणवत्तेनुसार घाऊक दरात चढ-उतार होत असले तरी चांगल्या प्रतीच्या लिंबाला मागणी कायम आहे. घाऊक बाजारातून किरकोळ बाजारात लिंबू पोहोचेपर्यंत वाहतूक, हमाली आणि इतर खर्चाची भर पडते. त्यामुळे ग्राहकांना लिंबासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. दररोजच्या जेवणासोबतच कोशिंबीर, भेळ, मिसळ, वडापाव तसेच विविध पदार्थांमध्ये लिंबाचा वापर होत असल्याने वाढलेल्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर झाला आहे.
पावसामुळे फुलोरा चांगला आला असला तरी फळधारणा कमी झाल्याने निर्माण झालेली टंचाई आणखी काही काळ राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत. आवक वाढली नाही तर लिंबाचे दर आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘अपचनावर लिंबू पचन करून देणार की नाही?’ असा मिश्कील सवाल ग्राहकांकडून केला जात असला, तरी वाढलेल्या दरामुळे स्वयंपाकघरातील लिंबाची चव मात्र चांगलीच महागली आहे.
एक लिंबू 12 ते 15 रुपयांना!
लिंबाची आवक घटल्याने किरकोळ बाजारात दर कडाडले आहेत. चांगल्या प्रतीचे एक लिंबू सध्या 12 ते 15 रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे नेहमीच्या जेवणात सहज वापरला जाणारा लिंबू आता ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ देत आहे.
पावसामुळे लिंबाच्या झाडांना फुलोरा चांगला आला; मात्र फळधारणा कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात आवक घटली आहे. सध्या आंध्र प्रदेश आणि सोलापूरहून लिंबाची आवक होत आहे. आवक वाढली नाही तर लिंबाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संतोष शेंडे,
लिंबू व्यापारी
