तारखेच्या दोन दिवस अगोदरच वेतन जमा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
विद्यार्थ्यांना घडविणार्या शिक्षकांना वेतन वेळेमध्ये मिळत नसल्याची ओरड कायमच राहिली आहे. मात्र, रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ई-कुबेर प्रणालीने आश्चर्याचा धक्काच दिला आहे. या प्रणालीद्वारे पाच हजार 916 शिक्षकांच्या खात्यात एक तारखेच्या दोन दिवस अगोदरच 44 कोटी 49 लाख 61 हजार 975 इतके वेतन जमा झाल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन हजार 565 शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच निवडणूक व इतर शासनाच्या योजनांची कामे जिल्हा परिषदेचे शिक्षक करतात. शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून त्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढविण्यातदेखील शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.
दर महिन्याच्या एक तारखेला शिक्षकांना जिल्हा परिषदेमार्फत त्यांचे वेतन दिले जाते. मात्र, पूर्वी वेतन मिळताना शिक्षकांना दोन ते पाच दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ जुळविताना अडचणी येत होत्या. त्यामुळे जिल्हा परिषद व कोषागार विभागाच्या समन्वयाने हा प्रश्न कायमचा सोडविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन थेट त्यांच्या खात्यात तारखेच्या अगोदरच देण्यासाठी ई-कुबेर प्रणाली सुरु करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या पाच हजार 876 शिक्षकांचे व 40 केंद्रप्रमुखांचे वेतन ई-कुबेर प्रणालीद्वारे खात्यात जमा करण्यात आले आहे. एक जुलैला होणारे वेतन जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन दिवस अगोदरच करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ई-कुबेर प्रणालीद्वारे शिक्षकांच्या खात्यात तारखेच्या अगोदरच वेतन जमा झाल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अशी आहे ही प्रणाली
जिल्हा परिषदेकडून कोषागार कार्यालयात शिक्षकांची यादी खाते क्रमांकानुसार दिली जाते. त्यानंतर ई-कुबेर प्रणालीद्वारे शिक्षकांचे बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड नंबरची पडताळणी ऑनलाईन पद्धतीने केली जाते. त्यानंतर तातडीने शिक्षकांच्या खात्यात एका क्लीकवर वेतन जमा केले जाते.
पूर्वी वेतनासाठी दहा ते पंधरा दिवस वाट पाहावी लागत होती. आता मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ई-कुबेर वेतन प्रणाली सुरु केली आहे. ही प्रणाली लाभदायक असून, ती कायमच ठेवण्यात यावी. एक तारखेला होणारे वेतन आता दोन ते चार दिवस अगोदरच झाल्याचा आनंद आहे.
प्रमोद भोपी, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,
अलिबाग तालुका







