दूरध्वनीची घंटी वाजली आणि चोर पसार झाले

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत शहरानजीकच्या दहिवलीमधील सुयोगनगरमध्ये राहणारे एक रहिवासी लंडनला आपल्या मुलाकडे गेले होते. रात्री चोर त्यांच्या सुयोगनगरमधील घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. त्यांनी त्यांच्या नातेवाईक व मित्रांना फोन करून ही घटना निदर्शनास आणून दिली आणि कर्जतच्या घरी असलेल्या दूरध्वनीवर फोन केला. दरध्वनीची घंटी वाजताच चोरांनी चोरी करण्याचे सोडून तेथून काढता पाय घेतला.

सुयोगनगरमध्ये राहणारे विमा अधिकारी दत्ता मोरे हे लंडनला आपल्या मुलाकडे गेले होते. तेथे रात्री नऊच्या सुमारास त्यांनी घराचा परिसर पाहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दृश्य पाहण्यासाठी आपला मोबाईल सुरू केला. त्यावेळी भारतात रात्रीचे सव्वा दोन वाजले होते. त्यांना आपल्या घराच्या दाराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या दोन व्यक्ती दिसल्या. त्यांनी लगेचच त्यांचे जावई सुशील बेलोसे यांना फोन केला. त्यांनी फोन उचलला नाही म्हणून मोरे यांनी त्यांचे मित्र वसंत मोधळे यांना फोन करून घटनेची कल्पना दिली. मोधळे लगेचच सुयोगनगरकडे जाण्यास निघाले. इकडे मोरे चोरांच्या हालचाली मोबाईलवर पहात होते. मोधळे पोहोचण्यास वेळ लागेल म्हणून त्यांनी घरी असलेल्या दूरध्वनीवर फोनच्या दोन-तीन घंटी देऊन ते थांबले. कुलूप तोडत असलेल्या चोरट्यांना घरात कुणीतरी फोन उचलला असे वाटल्याने त्यांनी पळ काढला.

त्यांनी सुशील बेलोसे यांना पुन्हा फोन लावला. बेलोसे आपला मित्र अक्षय ठाणगे याला घेऊन सुयोनगरकडे निघाले. या दरम्यान मोधळे तेथे पोहोचले होते. मात्र दोन्ही चोरटे अर्ध्या-एक मिनिटांपूर्वीच तेथून निघून गेले होते. त्यानंतर दहा मिनिटांनी बेलोसे आणि ठाणगे घटनास्थळी पोहोचले. विशेष म्हणजे मोरे यांच्या घरी एवढ्या रात्री काहीतरी गडबड आहे, हे शेजारी असलेल्या अरुण दास्ताने कुटुंबियांच्या निदर्शनास आले. परंतु ते दोघेही ज्येष्ठ नागरिक असल्याने बाहेर येऊ शकले नाहीत. त्यांनी लगेचच पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्या वेळात चोरटे त्यांच्या समोरूनच रस्त्यावरून पुढे जाताना दिसले. ते काळोखाचा फायदा घेऊन गेल्यावर गस्त घालत असलेली पोलीस गाडी तेथे आली. हे सारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. सुशील बेलोसे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात गेले असता केवळ तक्रार नोंदवून घेतली मात्र चोरी झाली नसल्याने पंचनामा करण्यास पोलिसांनी नकार दिला.

Exit mobile version