मुरुड, पोलादपूरमध्ये 41 अंश तापमानाची नोंद
रायगडः जिल्ह्यात कमाल तापमान सातत्याने वाढत असून, रविवारी अनेक ठिकाणी तापमानाने चाळिशी पार केल्याचे दिसून आले. परिणामी उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. उष्णतेचे चटके बसत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. रायगडातील वाढत्या तापमानाचा फटका पर्यटन व्यवसायाला बसत असून, ऐन हंगामात पर्यटकांनी पाठ फिरवल्याने किनाऱ्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. नागरिक घराबाहेर पडत नसल्याने रस्ते, बाजारपेठा निर्मनुष्य झाल्याचे पाहावयास मिळत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
पोलादपुरात तापमानवाढीचा कहर
तालुक्यात हिवाळ्यात रक्त गोठवणारी थंडी तर पावसाळ्यात मुसळधार पाऊस असतो, तसाच उन्हाळाही कमालीचा अंगाची काहिली करणारा जाणवत आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तब्बल 32 अंश सेल्सियस तापमान असलेल्या पोलादपूर तालुक्यात सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी ढगाळ वातावरणामध्ये तापमान 41 अंश सेल्सियसपर्यंत वाढले. यंदा एप्रिल महिन्यातच कमालीची तापमानवाढ होत असताना अजून मे आणि जून महिन्यांच्या मध्यापर्यंत पावसाला सुरूवात होईपर्यंत तापमानवाढीचा कहर पोलादपूरवासियांना सोसावा लागणार आहे.
पोलादपूर तालुक्यात मार्च महिन्याच्या शेवटी अवकाळी पाऊस तसेच एप्रिलच्या मध्यावर अवकाळी पाऊस झाला असून, सध्या तापमानवाढीचा कहर करण्यास सुरूवात केली आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास 32 अंशाची नोंद होत असताना सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास तब्बल 9 अंशाने पारा वाढून 41 अंश तापमान झाल्याने बाजारपेठ आणि गजबजलेले रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसून आले. गुरांनी झाडाची सावली आणि पक्ष्यांनीही घरट्यांचा आश्रय घेतल्याने सृष्टीचक्र ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर शहरातील बँक ऑफ इंडिया परिसरातील मराठी व्यापारीवर्गाने ग्राहकांच्या डोक्यावरचे टळटळीत ऊन टाळण्यासाठी ग्रीन नेटसचे छत रस्त्याला घालून सावली निर्माण केली आहे.
सध्या तालुक्यात सकाळपासून अंगावर घामाच्या धारा आणि घशाला कोरड पडण्याचे प्रकार तापमानवाढीमुळे सर्वांनाच अनुभवण्यास मिळत आहेत. उन्हामुळे चक्कर आल्यासारखी अथवा डोळयांवर अंधार आल्यासारखी भावना अनेकांना शरीराचे तापमान संतुलीत राहिले नसल्याची जाणीव करून देत आहे.