माथेरान घाटात अपघात; एकजण जखमी
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ-माथेरान घाटरस्त्याने कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो घाटातील चढ पार करीत असताना गाडी न्यूट्रल झाली आणि मागे येऊन उलटली. या युटिलिटी मॅक्स टेम्पोमधील 35 आदिवासी कामगार माथेरान येथे चालले होते. या अपघातात एक कामगार जखमी झाला असून मोठा अपघात टळला.
माथेरान शहरात एमएमआरडीएकडून रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याठिकाणी काम करणारे कामगार हे नेरळ-माथेरान घाटरस्त्यात असलेल्या जुम्मापट्टी भागात वस्ती करून राहतात. ते सर्व आदिवासी कामगारांना दस्तुरी नाका येथे नेण्यासाठी युटिलिटी मॅक्स टेम्पो शुक्रवारी सकाळी आठ वाजता जुम्मापट्टी येथून घेऊन जातो आणि सायंकाळी पुन्हा आणून सोडतो.
नेहमीप्रमाणे एमएच.47 वाय. 9572 या गाडीतून 35 कामगार माथेरान घाटातून प्रवास करीत होते. माथेरान घाटरस्त्यातील चढाव चढून जात असताना आलेल्या वळणामुळे फर्स्ट गेअरमध्ये गाडी आणत असताना टेम्पोच्या चालकाकडून गाडी न्यूट्रल गेअरमध्ये आली आणि चढाव पार करण्याऐवजी गाडी उतारावरून मागे येऊ लागली. त्यामुळे टेम्पोमधील कामगारांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली.त्यामुळे चालकाने गाडी सावरत डोंगराच्याकडेला धडक देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. चालकाचा हा प्रयत्न यशस्वी झाला. परंतु गाडी डोंगराला धडकून रस्त्यावर उलटली.
सकाळी साडेआठला झालेल्या या अपघातात टेम्पोमधील बाळा मनोहर ढोले हा 25 वर्षीय कामगार जखमी झाला. स्थानिक आदिवासी कार्यकर्ते जैतु पारधी आणि गणेश पारधी यांनी अपघातस्थळ गाठले. तेथून जखमी ढोले या कामगाराला घेऊन बदलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या कामगारावर उपचार सुरू असून या अपघातात मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. या अपघातात नेरळ-माथेरान घाटरस्त्यात एकमार्गी वाहतूक सुरू होती. मात्र एक तासाच्या आत टेम्पो तेथून उचलण्यात आल्याने रस्ता मोकळा झाला.