आदिवासी शेतकऱ्याच्या बैलजोडीची चोरी

रोजगार हिरावल्याने घरी स्मशान शांतता

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीमधील डामसेवाडी येथील आदिवासी शेतकऱ्याच्या बैलाची जोडी चोरीला गेली आहे. बैलगाडी आणि बैलाची जोडी यांच्या माध्यमातून उदरनिर्वाह शोधणारे शेतकरी खंडवी यांच्या घरात दोन्ही बैलांच्या चोरीमुळे स्मशान शांतता पसरली आहे. दरम्यान, पोलिसांकडून या बैलचोराचा बंदोबस्त होईल काय? असा प्रश्न स्थानिक आदिवासी विचारत आहेत.

नांदगाव ग्रामपंचायतीमधील डामसेवाडी येथील विनायक महादू खंडवी यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह बैलगाडीवरून होणारी वाहतूक करीत होती. त्या बैलगाडीला बांधले जाणारे दोन बैल 16 जानेवारी रोजी पहाटेच्या वेळी चोरीला गेले आहेत. डामसेवाडी येथील खंडवी यांना इंदिरा आवास योजनेतून घर मंजूर झाले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या राहत्या घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या शेतात घरासाठी विटा पाडण्याचे काम सुरू केले होते. त्यात घराचे बांधकाम करायचे असल्याने खंडवी यांनी आपले राहते घर देखील मोडून टाकले आहे. त्यामुळे आपली बैलाची जोडी ही शेतावरील विटा बनविण्याचे ठिकाणी बांधून ठेवत असतात. नांदगाव ग्रामपंचायतीमधील बहुसंख्य ग्रामस्थ यांना माती, वाळू, पाणी, दगड, विटा आदी वस्तूची ने आण करण्याचे काम खंडवी बैलगाडीमधून काम करीत असतात. त्यामुळे जिवाहून प्रिय असलेली बैलाची जोडी खंडवी रात्रीच्या वेळी आपल्या शेतात बांधून ठेवायचे आणि त्याच ठिकाणी झोपायचे.

मात्र 12 जानेवारीच्या पहाटे आपल्या शेतात बैलजोडी नाही हे पाहून हताश झालेल्या खाडंवींनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर शेतकऱ्याची बैलजोडी ही उदरनिर्वाहासाठी एकमेव साधन होते. त्यामुळे आता खंडवी यांच्या घरात शोकाकुल वातावरण निर्माण झालेले आहे.

गुरांची तस्करी थांबणार का?
नेरळ पोलिसांनी या बैलजोडीचा शोध लावावा अशी मागणी नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राम खंडवी यांनी केली आहे. दुसरीकडे नांदगाव, ओलमन आणि खांडस हा परिसर ठाणे जिल्ह्याचे हद्दीवर असल्याने त्या भागात गुरांची तस्करी करण्याचे प्रमाण प्रचंड आहे. या भागात दर आठ दिवसांनी एका तरी गुराची चोरी होत असते. हे लक्षात घेवून जिल्हा सीमा हद्दीतून येणाऱ्या वाहनांच बंदोबस्त नेरळ पोलीस करणार काय? याकडे आदिवासी शेतकऱ्यांचे लक्ष्य लागून राहिले आहे.

या भागातील ग्रामस्थ आपल्या गोठ्यातील पशुधन चोरीला जाण्याच्या भीतीने रात्रभर जागत असतो. गतवर्षी आमच्या एका शेतकऱ्याला आपला पाय गमवावा लागला होता, तरी देखील गुरे तस्कर यांची हिम्मत वाढली असून पोलिसांनी प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात जाणारे रत्यावर गस्त वाढवली पाहिजे.

कृष्णा शिंगोळे,ग्रामस्थ चई
Exit mobile version