लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी

| पनवेल | वार्ताहर |

ब्युटी पार्लर चालवणार्‍या महिलेच्या घरामध्ये ग्राहक म्हणून गेलेल्या महिलेने या घरातून तब्बल 11 लाख 15 हजार रुपये किमतीचे दागिने चोरले. या चोरट्या महिलेला खांदेश्‍वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिमरन कौर असे या महिलेचे नाव असून, खांदेश्‍वर पोलिसांनी तिच्याकडून चोरुन नेलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत.

विपुला भालेकर (25) ही पनवेलमधील वाजे, चेरवली येथे कुटुंबासह राहते. येथेच तिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. सिमरन कौर हिने विपुलाशी ब्युटी पार्लरची सेवा घेण्यासाठी संपर्क साधला होता. 23 फेब्रुवारी रोजी सिमरन कौर ही ब्युटी पार्लरची सर्व्हिस घेण्यासाठी दुपारी आसुडगाव येथे गेली होती. तिने एसीमध्ये सर्व्हिस देण्यास सांगितल्याने विपुलाने तिला पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये नेले. दरम्यान, बेडरूममधील कपाटाला चावी असल्याचे सिमरनच्या लक्षात आले होते. त्यामुळे ब्युटीशियनचे काम झाल्यानंतर सिमरनने शरीर चिकट झाल्याचे सांगून मला अंग पुसून कपडे बदलायचे असल्याचे सांगत विपुलाला थोड्या वेळासाठी बेडरूममधून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर कपाटात असलेले सर्व दागिने तिने चोरले व रिक्षामधून निघून गेली. यादरम्यान विपुलाचा भाऊ विदेश घरी आल्याने त्याने आपल्या हातातील सोन्याचे कडे कपाटात ठेवण्यास पत्नीकडे दिले. ते घेऊन विदेशची पत्नी गेली असता कपाटात इतर दागिने नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यावर विपुलाने तात्काळ सिमरनला फोन करून आपल्या घरी बोलावून घेतले व दागिन्यांबाबत चौकशी करून ते परत देण्यास सांगितले. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर विपुलाने खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी सिमरन कौर हिला ताब्यात घेतले असता तिने चोरी केल्याचे कबूल केले.

Exit mobile version