| माणगांव | सलीम शेख |
माणगांव तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुकान फोडून काहीच नाही मिळाले तर चिल्लर किंवा काही हाताला मिळेल ते चोरी करत सुटले आहेत. अशीच एक घटना माणगांव तालुक्यातील मोर्बा येथे घडली आहे. येथे एका अज्ञात चोरट्यांने एक टपरी फोडली आणि तब्बल २६ हजार किंमतीचे सिगारेट चोरले आहेत.
या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. 3 च्या रात्री 11 ते दि. 4 च्या सकाळी 8:45 च्या दरम्यान मोर्बा नाक्यावरील ग्रामपंचायतच्या गाळा नंबर 2 मधील प्रशांत फुटाणकर यांच्या पानटपरीचा लॉक एका अज्ञात चोरट्यांने तोडून तब्बल 26 हजाराचे सिगारेट लंपास केले आहेत. या चोरीत गेलेल्या मुद्देमालाचे वर्णन फोर स्कोर कंपनीचे सिगारेट 4 पाकिटे, गोल्ड फ्याक कंपनीचे सिगारेट 3 बॉक्स, लाईट गोल्ड फ्लक कंपनीचे सिगारेट बॉक्स, क्लोमिक्स ऍडव्हान्स कंपनीचे सिगारेट 10 पाकीट, ब्लॅक क्रश कंपनीचे सिगारेट 10 पाकिटे, लाईट बटण कंपनीचे सिगारेट 5 पाकीट, व्हाइट क्रश कंपनीचे सिगारेट 10 पाकीट, मालब्रो कंपनीचे सिगारेट 5 पाकीट, डेरि मिल्क कंपनीची कॅडबरी असा एकूण 26,975/- किंमतीचा माल चोरीला गेला आहे.
या घटनेबाबत माणगांव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा रजिस्टर नं 21/2023 भा. दं. वि. स कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. किर्तीकुमार गायकवाड हे करीत आहेत.
अशाच प्रकारे माणगांव शहरातील निलांबर हॉटेलच्या बाहेरील पान टपरी देखील चोरट्यांनी फोडून सिगारेट पाकिटे लंपास केली आहेत. तर माणगांव शहरातील मोर्बा रोड कॉर्नर वरील केदार शिवदे यांची पान टपरी फोडून चोरट्यांनी चिल्लर लंपास केली आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यात चोरट्यांनी आता आपला मोर्चा पान टपऱ्या फोडण्याकडे वळविला आहे का? अशी चर्चा माणगांवमध्ये नाक्या-नाक्यावर सुरू आहे.