| पनवेल | प्रतिनिधी |
बेकायदेशीररीत्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्या वाहनासह पनवेल शहर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले होते. यावेळी गाडीचा चालक सराईत गुन्हेगार फरार झाला होता. त्याला अँटॉप हिल येथून पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आरोपींची संख्या तीन झाली आहे.
या गुन्ह्यामध्ये मोनिउद्दीन शेख रा. शिवाजीनगर, गोवंडी, पासू उस्मान कुरेशी रा. मानखुर्द हे दोन आरोपी पूर्वीच पकडण्यात आले होते, तर फरार गाडी चालक आरोपी मोहम्मद अली अकबर अली शहा रा. अँटॉप हिल, मुंबई याला वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील तुषार बोरसे, मिथुन भोसले, संदेश म्हात्रे व शशिकांत काकडे यांनी कोणतीही तांत्रिक मदत नसताना तसेच कोणतीही पूर्व माहिती उपलब्ध नसतानाही, गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कौशल्यपूर्ण तपास करून अँटॉप हिल येथून ताब्यात घेतले आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
गोमांस विक्रीप्रकरणी तिसरा फरार आरोपी ताब्यात
