| नागपूर | प्रतिनिधी |
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात आहे. मात्र, यावर्षी ही मराठी नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसाच्या साथीने होणार आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना येलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल होत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यांनातच राज्यात उन्हाचे चटके जाणवायला लागले आणि कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस जवळ पोहचले. मार्चच्या पूर्वार्धात हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिला. तर आता याच मार्च महिन्यात राज्य6 अवकाळी पाऊस बरसत असून पावसाचे येलो व ऑरेंज अलर्ट दिले जात आहेत.
हवामान खात्याने 20 मार्चपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. आता गुरुवारी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारी उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि गोवा भागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट, विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक घाट परिसर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने राज्यातील ज्या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामध्ये जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
कोकणात, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाडा तसेच विदर्भात सुद्धा तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडटासह विजांचा कडकडाटसह अवकाळी पावसाचा शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच यावेळी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने निरभ्र असेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस आणि 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.





