| माणगाव | वार्ताहर |
दिघी- मुळशी मार्गावर प्रवास करत असलेल्या पर्यटकांच्या जग्वार कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी (दि.16) रोजी दुपारी घडली. सुदैवाने गाडीत प्रवास करणाऱ्या पाचही पर्यटकांना वेळेत बाहेर पडता आले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडीतील महत्त्वाचे सामान, लॅपटॉप, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू आगीत जळून खाक झाले. घटनेची माहिती माणगाव पोलीस ठाण्यात समजताच नागरिकांनी घटनास्थळी एकच धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पवार रा. ताथोडे, मुळशी पुणे हे त्यांची पत्नी व 3 मुलीसह जग्वार कार ने दिघी ते मुळशी पुणे असा प्रवास करीत असताना चांदोरे गावचे हद्दीत अन्नपूर्णा हॉटेल समोरून जात असताना त्यांचे कारमधून अचानक धूर येऊ लागला हे वाहनचालकाच्या तात्काळ लक्षात येताच ही कार रस्त्याच्या कडेला उभी केली. परंतु, काही क्षणातच गाडीने पेट घेतला. पर्यटकांनी तत्काळ गाडी बाहेर धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ही कार पूर्णपणे आगीत जळून खाक झाली असून, या गाडीमधील लॅपटॉप, मोबाईल फोन या सह विविध वस्तूंचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच या मार्गावरून जाणारे येणाऱ्या प्रवासी, तसेच परिसरातील गावातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच स्थानिकांच्या मदतीने पाण्याचे टँकर ताबडतोब बोलवून आगीवर नियंत्रण मिळवण्यात काही अंशी यश मिळाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.