| ठाणे | प्रतिनिधी |
कुडाळ तालुक्यातील पाट तिठा येथे डंपर व मोटारसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात दहावीतील विद्यार्थिनी मनस्वी मेतर (16) हिचा डंपर खाली सापडून जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलस्वार जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि.16) संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. मनस्वी सोमवारी (दि.17) दहावीचा शेवटचा पेपर देणार होती. परंतु, त्याआधीच तिच्यावर काळाने घाला घातला. मनस्वीच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने पाट-निवती पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यानंतर अल्पवयीन मोटार- सायकलस्वार, त्याचे वडील व डंपरचालक अशा तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती निवती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.
वनविभागाचे अधिकारी सुरेश मेतर यांची मुलगी मनस्वी ही एस.एल. देसाई विद्यालय पाट या हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिकत होती. ती नेहमी एसटी बसने शाळेत जात होती. सध्या दहावीची परीक्षा चालू असून, सोमवारी दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपर होता. या विषयाच्या जादा वर्गासाठी ती हायस्कूलमध्ये क्लाससाठी जात होती. दरम्यान, हुमरमळा येथील तिच्या ओळखीतील एका मुलाने तिला म्हापण येथे आपल्या मोटारसायकलवर घेतले. त्यानंतर ते दोघेही पाट तिठा येथून कुंभारवाडीमार्गे पाट हायस्कूलकडे निघाले. याच मार्गावर परुळे ते कुडाळ वाळू वाहतूक करणार्या डंपरची व मोटारसायकलची जोरदार धडक झाली. मोटरसायकल रस्त्यावर पडली आणि मोटारसायकलस्वार व मागे बसलेली मनस्वी हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात मनस्वी दुर्दैवाने डंपरच्या मागील चाकाखाली सापडली आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.