| पुणे | प्रतिनिधी |
आज किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येने शिवप्रेमी शिवनेरीवर जमले आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र, यादरम्यान सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात 47 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या जखमींमध्ये घाटकोपर, राहुरी, रत्नागिरी, रायगड, खडकवासला, धुळे, ठाणे आणि मुंबईतील पर्यटकांचा समावेश होता. मधमाशांच्या हल्ल्याची माहिती मिळाल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण हे वन कर्मचाऱ्यांच्या पथकासह आणि पुरातत्व विभागाचे गोकुळ दाभाडे हे त्यांच्या पथकासह जखमींच्या मदतीसाठी पुढे आले. यानिमित्ताने वनविभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मधमांशांना अज्ञातांनी डिवचल्याने त्यांनी हा हल्ला केल्याची माहिसी समोर येत आहे. जोपर्यंत मधमाशा शांत होत नाही, तोपर्यंत शिवनेरी गड शिवभक्तांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे वनविभागाने जाहीर केले आहे. तसेच या मधमाशांना डिवचणाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवर आज फाल्गुन वद्य तृतीयेला तिथीनुसार शिवजयंती सोहळा संपन्न झाला.