। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी 15 ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, 16 ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात शुक्रवारी (दि.22) मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री सरनाईक बोलत होते. तसेच, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानुसार परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच, रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही ही केंद्रे 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत.
मराठी भाषा प्रशिक्षणासाठी आवश्यक मानधनाच्या खर्चासाठी मंत्री सरनाईक यांच्या विनंतीनुसार मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उर्वरित खर्च परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देणार
रिक्षा-टॅक्सी चालकांनी या उपक्रमात सहभागी होऊन यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांना परिवहन विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी चालकांची मराठी भाषेवरील व्यवहारिक क्षमता तपासण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये तोंडी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.




