शिस्तेत रंगला कबड्डीचा थरार

पुरुष गटात श्री गणेश दिवलांग; महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल अजिंक्य

| कापोली | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते येथे जाखमाता क्रीडा मंडळ आयोजित रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने शनिवार (दि.27) कबड्डी स्पर्धा पार पडलेल्या. स्पर्धेत श्री गणेश दिवलांग संघाने मिडलाईन कर्जत संघाला धूळ चारत अंतिम विजय मिळवत भव्य चषकावर आपले नाव कोरले. प्रकाश झोतात झालेल्या पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग घेतला होता. रायगड जिल्ह्यातील मातब्बर संघांनी स्पर्धेत सहभागी होऊन प्रेक्षकांना आपल्या खेळाचे प्रदर्शन घडविले. पुरुषाच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावातील मोठी पिछाडी भरून काढत श्री गणेश दिवलांगन संघाने मिडलाईन संघावर 22-17 असा धावफलक असताना 5 गुणांच्या फरकाने सहज विजय मिळवत जाखमाता क्रीडा मंडळ शिस्तेच्या रौप्य महोत्सवी कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला.

मुलींच्या लढतीत ओमकार वेश्‍वी या संघाकडे 2 गुणांची आघाडी होती. शेवटचे काही क्षण शिल्लक असताना कर्नाळा स्पोर्ट्स पनवेलच्या नंदिनी वाघे या खेळाडूने केलेल्या निर्णायक चढाईने 3 गडी बाद केले. सामन्यात ओंकार वेश्‍वी सहज बाजी मारणार असे वाटत असतानाच कर्नाळा स्पोर्ट्स महिला संघाने तुफानी खेळ करत चित्रच बदलून टाकले. संघाला विजयपथावर नेताना पनवेलच्या महिला खेळाडूने चतुरस्त्र खेळ केला. अटीतटीच्या लढतीत नेत्रदीपक कामगिरी करीत प्रेक्षकांचा श्‍वास रोखून ठेवणार्‍या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला.

पुरुष गटात प्रथम क्रमांक श्री गणेश दिवलांग, द्वितीय क्रमांक मिडलाईन कर्जत, तृतीय क्रमांक शिवशंभो पाटणेश्‍वर, चतुर्थ क्रमांक सोनार सिद्ध धाटाव, सर्वोत्कृष्ट खेळाडू पार्थ ठाकूर श्री गणेश, उत्कृष्ट चढाई धीरज बैलमारे, मिडलाईन कर्जत, उत्कृष्ट पकड अजय मोरे सोनार सिद्ध धाटाव यांना देण्यात आले.

महिला गटात प्रथम क्रमांक कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल, द्वितीय क्रमांक ओंकार वेश्‍वी, तृतीय क्रमांक भिल्लेश्‍वर किहीम,चतुर्थ क्रमांक मिडलाईन कर्जत, उत्कृष्ट फक्कड तेजा सपकाल कर्नाळा उत्कृष्ट चढाई धनश्री बेंद्रे किहिम, सर्वोत्कृष्ट खेळाडू इशा पाटील ओंकार वेश्‍वी यांना देण्यात आले.

भव्यदिव्य स्पर्धेस जिल्ह्यातील उद्योजक व राजकीय मित्र मंडळींनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी होण्यासोठी जाखमाता क्रीडा मंडळ शिस्तेचे अध्यक्ष संतोष पाटील, रमेश घरत, चंद्रकांत नाक्ती, प्रमोद नाक्ती, चंद्रकांत चालके, दशरथ धुमाळ, जाखमाता क्रीडा मंडळातील सदस्य व ग्रामस्थ मंडळ शिस्ते यांनी परिश्रम घेतले होते..

Exit mobile version