नोव्हेंबरमध्ये रंगणार रायगड प्रिमियर लिगचा थरार

। शिरढोण । प्रतिनिधी ।
अद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 177 व्या जयंतीचे औचित्य साधून रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने अचानक मित्र मंडळ शिरढोण यांच्यावतीने रायगड प्रिमियर लिग क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी पार पडलेल्या लिलाव सोहळ्यामध्ये एकूण 446 खेळाडूंची खरेदी करण्यात आली. यावेळी क्रांतीज्योत आणि क्रीडाज्योतीची वाजतगाजत मिरवणूक काढून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना आदरांजली वाहण्यात आली. पनवेल तालुक्यातील शिरढोण पाडा येथील आद्य क्रांंतिवीर वासुदेव बळवंत फडके भव्य मैदानावर मंगळवार, दि. 2 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2021 दरम्यान रायगड प्रिमियर लिग पार पडणार आहे. विसावा रिसॉर्ट्स येथे पार पडलेल्या लिलाव सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 32 संघ आणि रायगड, पुणे, मुंबई, ठाणे संघाच्या कर्णधार व व्यवस्थापकांनी सहभाग घेतला. रायगड जिल्ह्यातील तब्बल 2,755 खेळाडूंनी अग्रमानांकित स्पर्धेत खेळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण 446 खेळाडू लिलावात खरेदी करण्यात आले. यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षिस म्हणून भगवान कृष्ण यांची प्रतिमा असलेल चषक आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्‍वारूढ प्रतिमा असलेल्या चषकाचे अनावरण करण्यात आले. मालिकावीर खेळाडूला देण्यात येणार्‍या यामाहा कंपनीच्या दुचाकीचे देखील अनावरण करण्यात आले. एकूण 10 विजेत्या संघांना तब्बल 13 लाख रुपयांची रोख व वस्तू स्वरूपात पारितोषिक मिळणार आहेत. रायगड प्रीमियर लिगचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कार्याध्यक्ष महेश कडू, विशाल जितेकर, तेजस म्हात्रे, रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश गायकवाड, प्रशांत खानावकर, रायगड समालोचक अध्यक्ष संदीप पाटील, महेश म्हात्रे, मच्छिंद्र पाटील, प्रसाद भोईर, 24 लाईव्ह इव्हेंट्सचे संदेश पाटील, दिल्ली पब्लिक स्कुलचे अनुज अगरवाल, आर्यन स्पोर्ट्सचे समीर पाटील, शिरढोणच्या सरपंच साधना कातकरी, संगीता चौधरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

Exit mobile version